रशियातील नऊ हजार कि.मी.ची सायकल स्पर्धा पूर्ण करणारे आशियातील पहिले सायकलपटू

जागतिक पातळीवर अतिशय कठीण समजली जाणारी रशियातील ‘रेड बुल ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम’ ही नऊ हजार किलोमीटरची सायकल स्पर्धा शहरातील सायकलपटू आणि आयर्न मॅन डॉ. अमित समर्थ यांनी पूर्ण करून एक नवा इतिहास घडवला आहे. ही कामगिरी पार पाडणारे ते आशिया खंडातील पहिले सायकलपटू ठरले आहेत.

रशियातील मास्को शहरातून २४ जुलैला सुरू झालेल्या या स्पध्रेत जगभरातून दहा सायकलपटू सहभागी झाले होते. स्पर्धेचे एकूण १५ टप्पे होते.

मास्को ते व्हाल्दीव्होसेक हे तब्बल नऊ हजार २११ किलोमीटरचे अंतर डॉ. समर्थ यांनी २५ दिवसात (३४७ तास १६ मिनिटे १७ सेकंद) पूर्ण केले. त्यांच्यासह केवळ चार सायकलपटूंनी ही स्पर्धा पूर्ण केली. पीटर बिश्चॉप यांनी ३१५ तास ४५ मिनिटे २८ सेकंदाची वेळ नोंदवत पहिले स्थान पटकावले.

मायकल कॅन्ड्रसनने ३३३ तास १३ मिनिटे चार सेकंद, मार्सिलो फ्लोनटिनो सोरेसने ३४६ तास १९ सेकंदाची वेळ नोंदवली. या मोहिमेत डॉ. समर्थ यांनी ७९ हजार मीटरचा चढाव पूर्ण केला. यापूर्वीही त्यांनी अमेरिकेतील पाच हजार किलोमीटरची ‘रेस अक्रॉस’ ही स्पर्धा ११ दिवस २१ तास आणि ११ मिनिटात पूर्ण केली होती.

स्पध्रेच्या पहिल्या दहा टप्प्यापर्यंत  थकवा जाणवला नाही. मात्र, त्यानंतर मार्ग खडतर असल्याने स्पर्धा अधिक कठीण होऊ लागली. पाऊस, थंडी, धुके असे हवामानाचे अडथळेही होते. मात्र, केवळ आत्मविश्वासाच्या बळावर स्पर्धा पूर्ण करता आली. यापुढेही अशा स्पर्धामध्ये सहभागी व्हायला आवडेल.’’

– डॉ. अमित समर्थ