बुलढाणा : प्रसिद्धी च्या दृष्टीने उपेक्षित ठरलेल्या भारतीय डाक विभागाने अलीकडे कात टाकली आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध सेवा सुरु केल्या आहे. यामुळे डाक विभाग आणि कार्यालयापासून दुरावलेले ग्राहक, नागरिक पुन्हा या विभागाशी जुळल्याचे सुखद चित्र आहे.

डाक विभागाने पोस्ट बँक, दिवाळीचा फराळ देश विदेशात पोहोचवणे, विस्तारित पार्सल सेवा सारख्या योजना सुरु केल्या. बदलत्या काळानुसार नवनवीन योजना, सेवा नागरिकांच्या सेवा देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून डाक विभागातर्फे १ मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर “ज्ञान पोस्ट” ही नवीन सेवा सुरु करण्यात आली आहे.

दूरवरच्या बुलढाणा जिल्ह्यातही ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.विध्यार्थी, साहित्यिक, शैक्षणिक संस्था, प्रकाशक, पुस्तकं विक्रेता, ठोक विक्रेता यांच्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. तसेच इतर संस्था, संघटना यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरण्याची चिन्हे आहेत.

‘ट्रॅक व ट्रेसिंग’ ची सुविधा

या सेवांतर्गत डाक विभागाच्या ग्राहकांना पुस्तक, शैक्षणिक साहित्य रास्त दरात पाठविता येणार आहे. बुलढाणा विभागाचे अधीक्षक गणेश आंभोरे यांनी ही माहिती दिली.

शाळा, पुस्तक प्रकाशक, सरकारी शैक्षणिक संस्था, खाजगी शैक्षणिक संस्था, लेखक, समिक्षक व इतर ग्राहक साहित्य पाठवू शकणार आहे. यामध्ये कमीत कमी ३०० ग्राम व जास्तीत जास्त ५ किलो वजनाचे पुस्तक पाठविण्याची व्यवस्था आहे. खास म्हणजे सोबतच आपण पाठविलेल्या पुस्तकाचे वितरण होईपर्यंत ‘ट्रॅक अँड ट्रेस’ची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे आपण पाठविलेले पार्सल सध्या कुठे आहे याची माहिती ग्राहकाला संदेश द्वारे मिळत राहणार आहे.

तसेच पुस्तक समोरच्या ग्राहक वा वाचकास भेटल्यानंतर पुस्तक पोहचल्याची पावती सुद्धा पाठवणाऱ्या ग्राहकाला मिळणार आहे.त्यासाठी लागणारे दर ही रास्त आहेत. त्यामुळे सर्व शाळा, पुस्तक प्रकाशक, सरकारी शैक्षणिक संस्था, खाजगी शैक्षणिक संस्था, लेखक, समिक्षक व इतरांसाठी ‘ज्ञान पोस्ट’ ही सुविधा लाभदायक ठरणार असा दावाही अधीक्षक आंभोरे यांनी केले आहे.