नागपूर : ट्रॅव्हल्सने लांब पल्ल्याचा प्रवास करताना ट्रॅव्हल्स कार्यालयाने प्रवाशांचे बुकींग करताना त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे, मात्र शहरातील बहुतांश ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात केवळ नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदविले जाते. त्यामुळे गाडीचा अपघात झाल्यानंतर प्रवाशांची ओळख पटविणे कठीण होत असल्याचे वास्तव समृद्धी मार्गावरील अपघाताच्या निमित्ताने समोर आले आहे.

समृद्धी मार्गावरील पिंपळखुटा येथे रात्री एक ते दीडच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल कंपनीचा अपघात झाल्यानंतर या गाडीत कोण प्रवासी होते याची माहिती घेण्यासाठी नागपूर, यवतमाळ, वर्ध्याच्या ट्रॅव्हल कंपनीत अनेकांनी संपर्क केला. मात्र ट्रॅव्हल कंपनीकडून जी यादी देण्यात आली त्यात केवळ प्रवाशांची नावे आणि मोबाईल क्रमांकांची नोंद होती. त्यामुळे अपघातात कोण मृत झाले किंवा कोण जखमी झाले, प्रवासी कुठल्या गावातील आहे याबाबत ओळख पटविणे कठीण झाले होते. कारण मृतांचे चेहरे जळून गेले आहेत. त्यांच्या अंगावरचे कपडेही जळून गेले आहेत. मृतांचे सामानही जळून खाक झाले आहे.

हेही वाचा – नागपूर : अपघातानंतर ‘स्टारलिंक ट्रॅव्हल्स’चे कार्यालय सकाळपासूनच बंद; नातेवाईकांची अपघातस्थळाकडे धाव

कोणातेही ओळखपत्र शिल्लक नसल्याने या मृतांची किंवा गंभीर जखमी झालेल्यांची ओळख पटविणे कठीण झाले होते. केवळ नावावरून प्रवाशांची ओळख पटविणे कठीण झाले होते. विशेष म्हणजे, दीड महिन्यापूर्वी याच विदर्भ ट्रॅव्हलच्या गाडीचा किरकोळ अपघात झाला होता त्यावेळी कंपनीच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती.