मध्यप्रदेशहून आलेला भाऊ बहिणीच्या भेटीसाठी तिच्या गावाकडे जाण्यास निघाला. रेल्वेस्थानकाबाहेर उभा असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्याला जबर धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या भावाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बहिणीला भेटण्याची त्याची इच्छा अपूर्णच राहिली. ही दुर्घटना डोंगरी / बु. रेल्वे स्थानकाबाहेर घडली.
हेही वाचा >>>चंद्रपूर : प्रदूषणात भर घालणारा लॉयड्स मेटल प्रकल्प बंद करा; नीरीचा अहवाल, कारवाई मात्र शून्य
चिमन नत्थू पिलगर (५५ रा. सुकळी, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. ते तुमसर तालुक्यातील पवनारखारी येथे राहत असलेल्या बहिणीला भेटण्यासाठी मध्यप्रदेशहून रेल्वेगाडीने डोंगरी/बु. स्थानकावर आले होते. येथून बहिणीच्या गावाकडे जाण्यासाठी रेल्वेस्थानकाबाहेर निघाले असता शिवमंदिरासमोरील रस्त्यावर अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळ काढला.
हेही वाचा >>>बुलढाणा: निवडणूक विभागात कार्यरत शिपायाची आत्महत्या; कारण अस्पष्ट
परिसरातील नागरिकांनी जखमी पिलगर यांना गोबरवाही आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्रथमोपचार करून तुमसर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन मदनकर करीत आहेत.