नागपूर : काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या नावाने नागपूरच्या आरटीओकडून २५ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. या प्रकरणात रोज नवीन माहिती पुढे येत असून, लाचखोर दिलीप खोडे थांबलेल्या रविभवनातच आमदार डॉ. मिर्झा यांच्या नावानेही वेगळी खोली आरक्षित होती. त्यामुळे दोघांचा काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दिलीप खोडे याच्या नावाने रविभवनातील इमारत क्रमांक १ मध्ये २० क्रमांकाची खोली आरक्षित होती. ही खोली २८ मार्च २०२३ रोजी काही तासांसाठी वापरली गेली. रविभवनाच्या इमारत क्रमांक ४ मधील ४५ क्रमांकाची खोली डॉ. वजाहत मिर्झा यांच्या नावाने २६ मार्च ते २९ मार्चदरम्यान आरक्षित असल्याचे रविभवनच्या नोंदवहीतून स्पष्ट झाले आहे. रविभवन येथे दिलीप खोडे व डॉ. मिर्झा यांच्या नावाची खोली आरक्षित असल्याच्या वृत्ताला नाव न टाकण्याच्या अटीवर सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी दुजोरा दिला.
रविभवनात माझे सुरक्षारक्षक थांबतात
“नागपुरात माझ्या मुली शिकत असून माझे घरही आहे. त्यामुळे मी रविभवनात राहण्याचा प्रश्नच नाही. परंतु, बऱ्याचदा माझे सुरक्षारक्षक रविभवनला थांबतात. दोन दिवस ते तेथे थांबले होते. परंतु, त्याचा नागपुरात घडलेल्या लाच प्रकरणाशी संबंध नाही. माझे नाव वापरून नाहक बदनामी केली जात आहे.” असे आमदार डॉ. वजाहत मिर्झा म्हणाले.
“एसीबीकडे असलेल्या संपूर्ण डाटाची चाचपणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावरच या प्रकरणात आमदार वा आणखी कुणाच्या सहभागाबाबत स्पष्टता येईल. कुणाही जबाबदार व्यक्तीबाबत काहीही बोलणे योग्य नाही. रविभवनातील खोल्यांच्या आरक्षणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती मागवली आहे.” असे एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर म्हणाले.