लोकसत्ता टीम

बुलढाणा: नेमणुकीला शिक्षण विभागाची मान्यता मिळवून देण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना एका वरिष्ठ लिपिकास मलकापूर बस स्थानक परिसरात रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

विलास सोनुने (५२, नंदनवन नगर, मलकापूर, जि. बुलढाणा) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव असून तो मलकापूर येथील गोंविंद महाजन शाळेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. मलकापूर येथीलच रहिवासी तक्रारदाराच्या भावाचा अनुकंपा तत्त्वावरील नेमणुकीला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची मान्यता मिळवून देतो, असे त्याने सांगितले.

हेही वाचा… बुलढाणा : टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; वारकरी सेनेचे प्रतिकात्मक आंदोलन

तक्रारकर्त्यास यासाठी त्याने २ लाख रुपयांची मागणी केली. याला वरकरणी होकार देऊन तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यावरून विभागाच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी उशिरा मलकापूर बसस्थानकमधील रसवंतीजवळ लाखाची रक्कम स्वीकारताना सोनुने यास पकडले. उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विलास साखरे, गौरव खत्री, स्वाती वाणी, प्रवीण बैरागी, मोहम्मद रिजवान, विनोद लोखंडे, यांनी ही कारवाई केली.