नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऐन पोळ्याच्या दिवशी २७ ऑगस्टला अनिवार्य इंग्रजी विषयाची परीक्षा ठेवल्याने प्राचार्य फोरमकडून याला कडाडून विरोध होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पोळा हा अत्यंत महत्त्वाचा सण असताना या दिवशी परीक्षा ठेवणे अन्यायकारण असून ही परीक्षा स्थगित करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. विद्यापीठाचे चुकीचे नियोजन आणि सरकारकडून परीक्षेसंदर्भात वेळोवेळी बदलत असणाऱ्या नियमांमुळे यंदा परीक्षा उशिरा सुरू झाली. त्यामुळे विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा ही सुट्टीच्या दिवसांमध्ये सुरू ठेवली आहे. शिवाय विदर्भात यंदा अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक पेपर रद्द करावे लागते. त्यामुळे विद्यापीठाला परीक्षा रद्द करणे कठीण होत असल्याने ऐन पोळ्याच्या दिवशीही परीक्षा ठेवण्यात आली. मात्र, ग्रामीण भागासाठी पोळा हा महत्त्वाचा सण आहे. ग्रामीण भागामध्ये या सणाला महत्त्व असताना विद्यापीठाने तीन पाळ्यांमध्ये परीक्षा ठेवली आहे. शिवाय अनिवार्य इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने विद्यार्थी संख्याही अधिक राहणार आहे. प्राध्यापक मंडळीही या दिवशी सुट्टीवर असतात. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांची अडचण लक्षात घेता हा दिवस टाळून दुसऱ्या दिवशी परीक्षा घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

पोळा हा ग्रामीण भागासाठी अत्यंम महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे विद्यार्थी या दिवशी महाविद्यालयात येत नाही. तसेच बस बंद असल्यानेही त्यांची अडचण असते. यासंदर्भात कुलगुरू डॉ. चौधरी यांच्याशी चर्चा केली असता ते सकारात्मक आहेत. मात्र, परीक्षा विभाग या दिवसाचा पेपर स्थगित करण्यास तयार नाही. तेव्हा परीक्षा विभागाने विद्यार्थी हित लक्षात घ्यावे.

-डॉ. आर. जी. टाले, सचिव, प्राचार्य फोरम.