वाशिम: जिल्ह्यात शहरी तथा ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे मोठे पीक आले आहे. काही ठगबाजांनी शिक्षण विभागाची कुठलाही परवानगी न घेता बोगस शाळा सुरू करून पालकांची आर्थिक लुबाडणूक सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बोगस शाळांचा गोरखधंदा कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा सवाल ‘आप’च्यावतीने शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

आपच्यावतीने शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनानुसार, जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिक्षणाच्या नावाखाली बोगस इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा उघडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळल्या जात आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून कुठल्याही माध्यमाची शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी, त्याबाबतची नोंदणी शिक्षण विभागाकडे करणे गरजेचे आहे.

हेही वाचा… बुलढाणा: जिल्हा परिषदेविरोधात एकवटले माटरगाव; कडकडीत बंद; विद्यार्थी आंदोलनानंतर पालकांवर केलेल्या कारवाईचा निषेध

मात्र, राजकीय बळाचा वापर करून जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिक्षण विभागाची कुठलीच परवानगी न घेताच पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. अशा शाळांवर वेळीच कारवाई करणे गरजेचे असल्याची बाब निवेदनात नमूद केली आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी तथा राज्याचे शिक्षण मंत्री यांना दिल्या आहेत.

हेही वाचा… गोंदियातील भात रोवणी अंतिम टप्प्यात; ८६.४७ टक्के क्षेत्रात पेरणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे रिसोड येथे एका बोगस शाळेवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई बघता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बोगस शाळा सुरू असल्याची चौकशी केल्यास अनेक गंभीर प्रकार उघडकीस येऊ शकतात. बोगस शाळेचे पीक शिक्षण विभागातील काही भ्रष्ट अधिकारी -कर्मचारी यांना हाताशी धरूनच होत असल्याचा आरोप असून बोगस शाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आप ने केली आहे.