बुलढाणा: प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदारांसाठी काहीतरी ‘नवीन देण्याची’ भारतीय निवडणूक आयोगाची अघोषित परंपरा आहे. लवकरच होऊ घातलेल्या यंदाच्या निवडणुकीत देखील ही परंपरा कायम राहणार आहे. यंदा काही विशिष्ट मतदारांसाठी आयोगाने ‘अबसेंटिव्ह’ मतदानाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
प्रसिद्धी माध्यम आणि राजकारण्यासाठी ‘रणसंग्राम’ अशी लोकसभा निवडणुकीची व्याख्या केली जाते. मात्र निवडणूक आयोग, निवडणूक विभाग या प्रशासकीय यंत्रणानुसार लोकसभा निवडणूक म्हणजे ‘लोकशाहीचा उत्सव’ आहे. यामुळे हा उत्सव साजरा करताना आयोग दरवेळी उपयुक्त प्रयोग करतो. वानगी दाखल सांगायचे झाल्यास ‘व्हीव्ही पॅट’, केवळ महिला कर्मचारी नियुक्त असलेले ‘पिंक बूथ’, केंद्रावरील मतदानाचे ‘वेब कास्टिंग’द्वारे प्रक्षेपण हे उपक्रम सांगता येईल. ही अलिखित परंपरा यंदाही कायम राहणार आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत ‘अबसेंटिव्ह’ मतदानाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत काही विशिष्ट मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या विशिष्ट मतदारांमध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयोवृद्ध मतदार आणि पायाने अधू (चालण्यास असमर्थ) मतदारांचा समावेश आहे. या मतदारांना आपले मत घरबसल्या देता येणार आहे. या मतदारांना ‘पोस्टल बॅलेट’च्या धर्तीवर मतदान करता येईल. यासाठी मतदानावेळी निवडणूक विभागाचे कर्मचारी पोलिसांसह संबधित कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन (गुप्त) मतदान करून घेतील. त्याची नियमित मतमोजणीत गणना करण्यात येणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
बुलढाण्यात सव्वाआठशे शतायुषी मतदार!
दरम्यान बुलढाण्यापुरते सांगायचे झाल्यास, मतदारसंघात ८० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या ५९ हजार ६६ इतकी आहे. यामधील शतायुषी (१०० ते १२० वर्षा दरम्यानच्या) मतदारांची संख्या ८२१ इतकी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या १६ हजार ४०५ आहे. त्यापैकी किती जण चालण्यास असमर्थ आहेत, याची ७ विधानसभानिहाय माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे.