यवतमाळ : तस्करीसाठी तस्कर काय काय क्लुप्त्या योजतील याचा नेम राहिला नाही. यवतमाळ जिल्हा हा तेलंगणा राज्याच्या सीमेवर असल्याने जिल्ह्यात विविध तस्करीचे प्रमाण मोठे आहे. गुरुवारी मात्र सुगंधित सुपारीच्या तस्करीची पद्धत बघून पोलिसही चक्रावले. चक्क अंड्यांच्या ट्रेमधून ही सुपारी तेलंगणातून जिल्ह्यात आणली जात होती. राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिसांनी कारवाई करीत नागपूर – हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर तस्कराला ताब्यात घेतले.
सुगंधित सुपारीची तस्करी होत असल्याची माहिती वडकी पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तस्कराला रंगेहात ताब्यात घेतले आहे. या तस्कराकडून चक्क अंड्याच्या स्ट्रेच्या आड सुगंधित सुपारी लपवून लगतच्या तेलंगणा राज्यातून आदिलाबाद येथून वडकी परिसरात आणली जात होती.
हेही वाचा – ‘जनसंवाद’ अर्ध्यावर सोडून उद्धव ठाकरे मुंबईकडे; म्हणाले, मनोहर जोशी…
नागपूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरून एका वाहनातून अवैध सुपारीची तस्करी होत असल्याची माहिती वडकी ठाणेदार विजय महाले यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील शेरे पंजाब धाब्याजवळ सापळा रचला. यामध्ये सुगंधित सुपारीने भरलेले संशयित वाहन (क्र.टीएस- १९, टीऐ -११५१) ची तपासणी केली, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यात बंदी असलेली सुगंधित सुपारी भरलेल्या बारा पिवळ्या रंगाच्या गोण्या आढळून आल्या. पोलिसांनी वाहन जप्त करून वाहन चालक दानिश मिर्झा रा. आदिलाबाद यास ताब्यात घेतले. वाहनातील जप्त केलेली सुपारी इगल, मजा, होला, अशा वेगवेगळ्या कंपनीची होती.
हेही वाचा – तापमान वाढताच विजेची मागणी २६ हजार मेगावॉटवर, एवढ्या विजेची उपलब्धता…
ही तस्करी राष्ट्रीय महामार्गावरून अंड्याच्या आडून नेहमीच सुरू होती. गुंगारा देऊन सुरू असलेली तस्करी पोलिसांच्या कारवाईने उघड झाली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठाणेदार विजय महाले, उपनिरीक्षक प्रशांत जाधव, जमादार विलास जाधव, वाहन चालक विनोद नागरगोजे, सचिन नेहारे, आकाश कुदुरसे यांनी केली.