नागपूर : अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीला प्रस्तावित नागपूर जिल्ह्यातील दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाणीबाबतची जनसुनावणी बुधवारी संतप्त नागरिकांनी उधळून लावली. या खाणीला भाजप व काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनीही कडाडून विरोध केला. यावेळी अदानीविरोधात घोषणाबाजी केली.
अंबुजा सिमेंट्स लिमिटेडकडे स्पर्धात्मक लिलाव प्रक्रियेत ही खाण आली. १ हजार ५६२ हेक्टर खाणकाम भाडेपट्टा क्षेत्रापैकी फक्त २४.०५ हेक्टर जमीन खाणकाम आणि हरित पट्टा विकासासाठी वापरली जाणार आहे. खाणीबाबतची जनसुनावणी बुधवारी वलनी येथे होती. सुनावणीपूर्वी परिसरातील प्रकल्पामुळे फटका बसणाऱ्या दहा गावांच्या नागरिकांनी एकत्र येत खाणीला विरोध करत घोषणा दिल्या.
सुनावणीसाठी उभारलेल्या मंडपात मोठ्या संख्येने राजकीय पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते. नागरिकांचा संताप बघत महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे यांनी खाणीबाबतच्या जनसुनावणीचे कारण उपस्थितांना सांगितले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खोंडे यांनी जनसुनावणी सुरू करत असल्याचे सांगताच नागरिक संतापले.
काँग्रेस नेत्या कुंदा राऊत, आमदार समीर मेघे, भाजप नेते राजीव पोद्दार यांनी नागरिकांची समजूत काढत सुनावणीत आपला विरोधाचे मुद्दे इतिवृत्ताद्वारे जाऊ देण्याचा आग्रह धरला. परंतु संतप्त नागरिकांनी ही खाण रद्द करण्याचे लेखी देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खोंडे यांनी या जनसुनावणीच्या इतिवृत्तात सर्व नागरिकांचा खाणीला विरोध असल्याचे शासनाला पाठवण्यासह सुनावणी कायमची संपवत असल्याचे इतिवृत्तात नमूद केले.
स्थानिकांचा विरोध का?
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयापासून ४.२ किलोमीटर अंतरावर असलेल्या खाणीमुळे दहा लाख लोकांना जल-वायुप्रदूषणाचा धोका आहे. खाण क्षेत्रात व त्याच्या आसपास वीसहून अधिक शाळा व महाविद्यालये आहेत. लाखो लोकांच्या व प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा एकमेव स्रोत या नद्या-तलाव आहेत. खाणीमुळे नद्या-तलाव प्रदूषित होण्याची शक्यता असल्याचे स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
अदानी कंपनीचे म्हणणे काय?
अदानीच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खाणकाम भूगर्भात असल्याने, आजूबाजूच्या आवाजाच्या पातळीवर मोठा परिणाम होणार नाही. ब्लास्टिंग नसल्याने जमिनीवर कंपनही होणार नाही. खाणीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केला जाईल आणि भूमिगत ऑपरेशन्समध्ये वापरले जाईल. प्रस्तावित खाणकाम पूर्णपणे शून्य कचरा प्रणालीवर आधारित असेल. अतिरिक्त पाणी नैसर्गिक ओढ्यांमध्ये आणि जवळच्या तलावांमध्ये सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया केली जाईल, ज्याचा वापर ग्रामस्थ शेतीसाठी करू शकतील.