युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची बुलढाण्यातील जाहीर सभा अखेर रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता ते मढ येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. या सभारूपी राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईत ठाकरे गटाने सपशेल माघार घेतल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे.आदित्य ठाकरे यांची उद्या ७ नोव्हेंबरला बुलढाणा व मेहकर येथे जाहीर सभा नियोजित होती. मात्र यासाठी निर्धारित गांधी भवन हे स्थळ पोलिसांनी नाकारले. यामुळे पोलीस विभाग व ठाकरे गट समोरासमोर उभे ठाकले होते. यातच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्ह्यात दाखल झाले.
हेही वाचा >>>नागपुरात सरकारी समाजप्रबोधन कार्यक्रमात अश्लील नृत्याचा कळस, Video व्हायरल
मात्र, अखेर ठाकरे गटाने नमते घेत सभाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता सभेऐवजी उद्या, सोमवारी दुपारी ३ वाजता शेतकरी संवाद ठेवण्यात आला आहे. बुलढाण्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावरील मढ येथे हा संवाद होणार आहे.
मेहकरातील सभा ‘फायनल’
बुलढाण्यातील सभा रद्द झाली असली तरी, मेहकरातील सभा ‘फायनल’ असल्याचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर व उपजिल्हाप्रमुख आशीष रहाटे यांनी स्पष्ट केले. मेहकरातील स्वांतत्र्य मैदानावर ७ तारखेला दुपारी १२ वाजता ही सभा होणार आहे. यानंतर मढ येथे शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर आदित्य ठाकरे’ सिल्लोडमार्गे औरंगाबादकडे रवाना होतील.