एकापाठोपाठ निवडणुका, आचारसंहितेचा फटका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी काळात एकापाठोपाठ एक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि या दरम्यान होणाऱ्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या आचारसंहितेमुळे पुढील चार ते पाच महिने तरी सरकारची सर्व सूत्रे प्रशासनाच्या हाती येणार आहेत. त्यामुळे मंत्र्यांच्या मागे धावणारे अधिकारी असे चित्र या काळात पाहायला मिळणार नाही.

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. आचारसंहिताही लागू झाली आहे. मार्च २०१७ पर्यंत नागपूर महापालिका, नागपूर जिल्हा परिषद आणि विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघात निवडणुका होणार आहे. एकापाठोपाठ एक होणाऱ्या निवडणुकांसाठी लागणाऱ्या आचारसंहितेत किमान पाच महिन्यांचा काळ तरी जाणार आहे. या काळात अधिकाऱ्यांचेच राज्य प्रशासनावर असेल. मंत्री किंवा लोकप्रतिनिधींची प्रशासनातील ढवळाढवळ थांबणार असली तर विकास कामांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

नगर पालिका निवडणुकीसाठी सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली. विदर्भातील ६० नगरपालिकांसाठी  नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत चार टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. एका जिल्ह्य़ात तीन पेक्षा कमी पालिकांच्या निवडणुका असेल तर आचारसंहितेची व्याप्ती त्या शहरापर्यंत मर्यादित असणार आहे, मात्र त्यापेक्षा जास्त पालिकांमध्ये निवडणुकाअसेल तर संपूर्ण जिल्ह्य़ात आचारसंहिता लागू केली जाणार आहे. नागपूर जिल्ह्य़ातील ९ पालिकांमध्ये निवडणुका असल्याने आचारसंहिता सर्व जिल्ह्य़ालाच लागू होणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. मात्र, मार्च २०१७पर्यंत महापालिकेची मुदत असल्याने त्यापूर्वी नवीन महापौर निवडणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणुकीची पक्रिया त्यापूर्वी पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे साधारणपणे फेब्रुवारीमध्ये या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी जानेवारीपासून आचारसंहिता लागू होईल. अशीच प्रक्रिया जिल्हा परिषदेसाठी राबवावी लागणार आहे. यासाठी लागू करण्यात आलेली आचारसंहिता मार्च महिन्यार्पयच राहण्याची शक्यता आहे.

शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदाराचा कार्यकाळ ५ डिसेंबर २०१६ पर्यंतच आहे, त्यापूर्वी या निवडणुका होणार होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुकांसाठी सध्या नवीन मतदार यादी तयार केली जात असून ती

डिसेंबर अखेपर्यंत पूर्ण केली

जाणार आहे. या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी व्यक्त केली आहे. यासाठी लागणारी आचारसंहिता ही पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ात लागू होईल.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक जाहीर झाल्यापासून तर मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहते. सत्ताधारी पक्षाकडून मतदारांवर प्रभाव पडू शकेल अशा कोणत्याही घोषणा सरकारकडून केल्या जाऊ नये म्हणून या काळात मंत्री आणि इतर लोकप्रतिनिधींना शासकीय बैठका घेण्यास मनाई केली जाते.

आगामी निवडणुका

स्थानिक स्वराज्य संस्था                मुदत

नागपूर महापालिका              मार्च २०१७

नागपूर जिल्हा परिषद           मार्च २०१७

शिक्षक मतदारसंघ              डिसेंबर २०१६

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administration get all power after code of conduct imposed in maharashtra
First published on: 19-10-2016 at 04:54 IST