नागपूर: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा शनिवारी बारावी गणिताचा पेपर समाज माध्यमांवर फिरत असल्याच्या चर्चेने कॉपीमुक्त अभियानावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील भाग ‘अ’चे प्रश्न समाज माध्यमांवर ‘व्हायरल’ झाल्याची चर्चा सुरू झाली.

शहरातील बऱ्याच केंद्रांबाहेर यावरून संशयास्पद हालचाली दिसल्या. मात्र, विभागीय शिक्षण मंडळाने अशाप्रकारे प्रश्नपत्रिका व्हायरल झाली नसल्याचे स्पष्ट करीत नकार दिला. शनिवारी सकाळी ११ पासून गणिताचा पेपर सुरू होणार होता. मात्र शहरातील काही केंद्रांवर सकाळी १०.३० च्या सुमारास गणिताची प्रश्नपत्रिका समाज माध्यमावर फिरत असल्याची चर्चा सुरू झाली.

ही प्रश्नपत्रिका ग्रामीण भागातील एखाद्या केंद्रावरून व्हायरल झाली असल्याचे सांगितले जात होते. शहरातही अनेक केंद्रांवर प्रश्नपत्रिकेतील काही व्हायरल झाल्याची माहितीही व्हायरल झाली. हा भाग ‘ट’मधील पर्यायवाचक प्रश्नांचा होता. भाग ‘अ’च्या आठ प्रश्नांसाठी १६ गुण आहेत. हाच भाग समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याची चर्चा होती. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या उत्तरांचे पर्याय असलेला कागदही व्हायरल झाला. पण तोवर विद्यार्थी परीक्षेसाठी आत गेले होते.

यासाठी काही केंद्रांबाहेर तरुणांच्या संशयास्पद हालचालीही दिसून आल्याची माहिती आहे. हा पेपर काहीच विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्याचीही चर्चा होती. मात्र, पेपर फुटीचा लाभ किती व कोणत्या विद्यार्थ्यांना झाला, याबाबत स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, या चर्चेने शिक्षण मंडळाच्या गोपनियतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. पेपर फुटल्याची शक्यता मात्र शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी धुडकावून लावली. अशाप्रकारची कुठलीही घटना घडलेली नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले.

शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही भ्रमनध्वनी बंदी करा

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भ्रमनध्वनी व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जमा करून घेतली जातात. त्याच धर्तीवर केंद्रप्रमुख, निरीक्षक शिक्षक व केंद्रांवर तैनात कर्मचाऱ्यांनाही भ्रमनध्वनी मनाई करावी, अशी मागणी होत आहे. यामुळे परीक्षेवर नियंत्रण मिळवता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परीक्षेत कसलाही गैरप्रकार सहन होणार नाही, हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांपासून पोलिस आयुक्तांपर्यंत सगळी यंत्रणा लक्ष ठेऊन आहे. मलाही याबाबत संपर्क करण्यात आला होता. मात्र, तसा कुठलाही ठोस पुरावा नव्हता. तो असता तर लगेच सायबर गुन्हे शाखेला कळवून कारवाई झाली असती; पण तसे काहीच घडलेले नाही. त्यामुळे पेपर व्हायरल झाल्याची माहिती निव्वळ अफवा आहे. -चिंतामण वंजारी, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर.