नागपूर : विधिमंडळात सातत्याने नागपूरच्या गुन्हेगारीचा उल्लेख होतो. त्यामुळे एकीकडे सरकारची प्रतिमा डागाळते तर दुसरीकडे कुरघोडी करण्यासाठी विरोधकांना संधी मिळते. यातून सरकारची मलिन होणारी प्रतिमा उजळ करण्यासाठी आता पोलिसांनीदेखील कंबर कसली आहे.
मद्यप्राशन करून होणारा उन्माद हा सातत्याने वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांचे मूळ असल्याचे निदर्शनास आल्याने मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी ऑपरेशन ‘यू-टर्न’ सुरू केले. आता शहरात उशिरा रात्रीपर्यंत तळीरामांच्या बैठका सजवणाऱ्या मद्यालयांवर (बार ॲण्ड रेस्टॉरन्ट) पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पहिल्याच दिवशी अंबाझरी आणि सीताबर्डी पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीनंतर उशिरा रात्रीपर्यंत मद्य उपलब्ध करून देणाऱ्या तीन मद्यालयांवर कारवाई केली. बॅरल कॅफे, कॉफी हाऊस चौकातले लाहोरी बार अँड रेस्टॉरंट आणि मार्टिनी लाऊंज यांचा त्यात समावेश आहे. ही तिन्ही मद्यालये अत्यंत गजबजलेल्या धरमपेठेतील आहे. धरमपेठ, सीताबर्डी, धंतोली, सदर भागात मोठ्या प्रमाणात मद्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. याची इत्यंभूत माहिती पोलिसांना आहे. मात्र त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई होत नव्हती हे विशेष.
नियमानुसार ही मद्यालये रात्री १.३० ला बंद होणे अपेक्षित होते. तरीही उशिरा रात्री मद्यपींच्या बैठका बारमध्ये दिसल्याने उत्पादन शुल्क कायदा आणि सार्वजनिक सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणात बॅरल कॅफेविरुद्ध तर सीताबर्डी पोलिसांनी लाहोरी व मार्टिनी आस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
आठवडाभरात उतरवली ३३६ जणांची नशा
मद्य प्राशन करून सुसाट वेगात वाहन चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक शाखेने १० जुलैपासून ऑपरेशन ‘यू टर्न’ हाती घेतले आहे. आतापर्यंत वाहतूक शाखेने शहरात वेगवेगळ्या १० ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत १३३९ वाहनांची धरपकड करीत ३३६ मद्यपीं वाहन चालकांकडून दंड वसूल केला. यातील सर्वाधिक ३६७ वाहनांची धरपकड एकट्या इंदोरा परिसरात करण्यात आली. यात सर्वाधिक ७१ मद्यपी वाहन चालकांची झिंग पोलिसांनी उतरवली आहे.
नियमापेक्षा अधिक वेळ बार चालवणे नियमबाह्य आहे. बार, कॅफे किंवा हॉटेल चालकांनी वेळेची बंधने पाळणे गरजेचे आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईल. सजग नागरिकांनी कुणाचीही भीती न बाळगता अशा प्रतिष्ठानांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी. – रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त