अकोला : विदर्भाला शेतकरी आत्महत्येचा कलंक लागला आहे. आगामी काळात कृषी क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सोबत घेऊन शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भ करण्याचे प्रयत्न राहतील. ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पनेच्या माध्यमातून तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून उत्पादन खर्च कमी करण्यावर भर राहणार आहे, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी दिली.कुलगुरू डॉ. गडाख यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधतांना पुढील नियोजन स्पष्ट केले. विदर्भातील शेतकरी आत्महत्याचे दुष्टचक्र पुसन टाकण्यासाठी त्या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न राहणार आहे.

कृषी विद्यापीठाचे विदर्भातील ११ जिल्ह्याचे मोठे कार्यक्षेत्र आहे. काम करत असतांना रिक्त पदांसह अनेक मर्यादा येतात. त्यावर मात करत शेतकरी वर्ग केंद्रबिंदू मानून कार्य केले जाईल. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी यंत्रणेने त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. त्यातुलतनेत भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. यातून कर्जबाजारीपणा व इतर कारणामुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात. हे चित्र बदलण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत, असे डॉ. गडाख म्हणाले.

हेही वाचा : नागपूर- पुणे जाणारी खासगी बस एकच, मात्र वाहन क्रमांक दोन ; वाशीम पोलिसांची कारवाई

विदर्भातील पूर्व, मध्य व पश्चिम विभागातील पीक पद्धतीत काळानुसार अपेक्षित बदल करणे आवश्यक आहेत. ‘एक गाव- एक तंत्रज्ञान’, ‘एक गाव- एक वाण’ यासह ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पना कृषी विद्यापीठाकडून राबविण्यात येईल. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात एका गावाची निवड करून त्या गावाला कृषी क्षेत्राच्या दृष्टीने विकसित करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने तळागाळातील दुर्गम गाव निवडण्याचे प्रयत्न राहतील. ते गाव त्या जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल. या संकल्पनेतून विद्यापीठाचे तंत्रज्ञान, संशोधन शेतकऱ्यांपर्यंत नेले जाईल. त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च प्रामुख्याने कमी करण्यावर भर राहणार आहे. शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान व प्रगत संशोधनाचे अनुकरण केल्यास उत्पादन खर्च कमी करणे सहज शक्य आहे, असा विश्वास डॉ. गडाख यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्राशी संबंधित विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर…

उत्पादन ते विक्री ही साखळी देखील बळकट करणे गरजेचे आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. प्रक्रियाअभावी अत्यल्प भावात त्याची विक्री होते. यात कुठे तरी बदल झाला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालावर प्रक्रिया करण्यासह विपणन, विक्री ते निर्यातपर्यंत प्रशिक्षित केले जाईल. त्यातून शेतकऱ्यांना आपल्या गावातच अधिक नफा मिळू शकेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी साध्या सोप्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे विस्तारीत करण्यात येतील, असे डॉ. गडाख यांनी सांगितले.

शेतकरीभिमुख संशोधन व विस्तार कार्य

‘शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी’ या बिरुदावलीसह पुढे जाताना शेतकरीभिमूख संशोधन व विस्तार कार्य केले जाणार आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान अंमलात आणणारा कृषी पदवीधर निर्मितीचे ध्येय गाठत आत्मनिर्भर विद्यापीठ निर्मितीसाठी एकात्मिक प्रयत्नाची गरज आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रभावी उपायोजना कृतीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. शाश्वत ग्रामविकास साध्य करण्यासह कृषी विद्यापीठाच्या मानांकनात अधिक सुधारणा करण्याचे पूर्ण प्रयत्न राहतील, असे देखील डॉ. गडाख यांनी सांगितले.