गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अंगणवाडी भरतीत बनावट गुणपत्रिकेअधारे नियुक्तीआडून झालेला कथित आर्थिक गैरव्यवहार व भामरागडमधील विकासकामांमधील अफरातफरीची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी ९ जुलैपासून माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाला १० रोजी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला करत जिल्हा वाऱ्यावर सोडल्याची टीका केली.
यावेळी वडेट्टीवार यांनी अतिरिक्त जि.प. सीईओ राजेंद्र भुयार व महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. अंगणवाडी भरतीतील निवड समिती बरखास्त करून संबंधितांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली. भामरागडचे गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांच्यावर मग्रारोहयोमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याबाबत विभागीय चौकशी सुरू आहे. मात्र, अद्याप कारवाई झाली नाही. बदली झाल्यानंतरही त्यांना कार्यमुक्त केले जात नाही. वरिष्ठ अधिकारीच अशा लोकांना पाठीशी घालत असतील तर जिल्ह्याचे काय होईल, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी चिंता व्यक्त केली. हे सगळे विषय सोमवारी व मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी कंकडालवार यांना सरबत देऊन उपोषण मागे घ्यायला लावले. काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहोरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, कार्तिक तोगम,अज्जू पठाण, राजू दुर्गे, शिवराम पुल्लुरी आदी उपस्थित होते.
मलेरिया टास्क फोर्स काय कामाचे?
मलेरियामुक्त जिल्ह्यासाठी २५ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठित केली आहे. मलेरिया बळींचे सत्र सुरूच आहे. अडीच हजारांहून अधिक रुग्ण आहेत. मग टास्क फोर्स कुठे आहे, काय करतेय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. प्रशासकीय यंत्रणा सक्षम नाही का, टास्क फोर्सच्या नावाखाली जनतेच्या पैशांतून कोणाचे खिसे भरताहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.