झाडांची पाने गळणे, झाडांचा रंग बदलण्याची प्रक्रिया फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात घडून येते. याच काळात जंगलाला आगी लागण्याचेही प्रकार घडतात आणि होळीसुद्धा याच काळात साजरी केली जाते. या सर्वाचा संबंध पर्यावरणाशी आहे. कारण गळणाऱ्या पानानंतर नवी पालवी येते आणि गळणारी पाने आगीत जळल्यानंतर जमीनही स्वच्छ होते. यामुळे अधिवासाचे व्यवस्थापन निसर्गत:च योग्यरीतीने राखले जाते.
चिटणवीस सेंटर आणि अलग अँगल या संस्थेच्यावतीने भारतीय सणे आणि पर्यावरणीय जबाबदारी याचे नातेसंबंध अजय ठोमरे यांनी उलगडले. घरी सण साजरे व्हायचे तेव्हा लहानपणी मी आईवडिलांना अनेक प्रश्न विचारत होतो. त्यावेळी फारसे काही कळत नव्हते. मोठी माणसे म्हणायची बघत राहा, पण ती दूरवर टिकणारी आठवण नव्हती. मध्यभारतात २० ते २५ सण वर्षभरात साजरे होतात. त्याची क्रमवारी, एकमेकांशी नाते शोधले. सणांना अनेकजण धर्माशी जोडतात. मानसिकरीत्या आराम मिळणे हा भारतीय सणांमधील मोठा भाग आहे. अक्षयतृतीया भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाची सांगड घालतो. तर वटपौर्णिमेला वडाची पूजा करण्यात येत असली तरीही सर्वाधिक ऑक्सिजन याच वडाच्या झाडातून मिळतो. त्यामुळे आयुष्य द्विगुणित होते. याप्रसंगी अजय ठोमरे यांनी वर्षभराच्या कालावधीत येणारे सण आणि त्यामागची अनेक गुपित उलगडली.