विरोधी पक्षनेते अजित पवार यांना काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी ‘हायजॅक’ केल्याने चंद्रपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे. विशेष म्हणजे, पवार यांनी धानोरकर दाम्पत्याच्या जनसंपर्क कार्यालय तथा अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या निवासस्थानी जाण्याचे टाळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दोन्ही जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केली, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन नुकसानीची माहिती जाणून घेतली. या दौऱ्यात पवार यांनी गडचिरोलीत राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष वासेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याउलट चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी राट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, कार्याध्यक्ष नितीन भटारकर किंवा अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्याचे घरी भेट देण्याचे टाळले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरी भेट टाळतांनाच त्यांनी काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या चंद्रपुरातील जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. विशेष म्हणजे, धानोरकर दाम्पत्याने पवार यांच्या स्वागताचे संपूर्ण शहरभर बॅनर, पोस्टर लावून एकप्रकारे वातावरण निर्मिती केली. तसेच अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या आईचा आशीर्वाद घेतला, अम्मा टिफीनचे कौतुक केले.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी भेट टाळणाऱ्या पवार यांनी काँग्रेस व अपक्षांच्या घरी भेट दिल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, तर दुसरीकडे धानोरकर दाम्पत्याने राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केल्याने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत.

विशेष म्हणजे, माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार निधी वितरणात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना डावलत होते ही बाब निदर्शनास आणून दिली तेव्हा, तुम्ही खासदार, आमदार निवडून देणार नाही आणि निधीची अपेक्षा ठेवणार ही बाब योग्य नाही म्हणून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनाही खडे बोल सुनावले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar meet congress mp dhanorkar ncp local leaders in chandrapur are upset scsg
First published on: 29-07-2022 at 08:30 IST