अमरावती : राजस्‍थानातील अजमेर हे ख्‍वाजा मोईनोद्दीन चिश्‍ती यांच्‍या दर्ग्यात दरवर्षी भरणाऱ्या उरूसासाठी प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या धर्माचे लोक त्‍यासाठी जातात. अमरावतीतील शेख मुसा यांची यात्रा मात्र वेगळी आहे. ते नित्‍यनेमाने दर्ग्यावर चादर अर्पण करण्‍यासाठी सायकलने सुमारे ९०० किलोमीटरचा अजमेरपर्यंतचा आणि नंतर अमरावतीकडे परतीचा असा अठराशे किलोमीटरचा प्रवास करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

६१ वर्षीय शेख मुसा हे व्‍यवसायाने वेल्‍डर आहेत. गेल्‍या २३ वर्षांपासून ते अजमेरच्‍या ख्‍वाजा मोईनोद्दीन चिश्‍ती यांच्‍या दर्ग्याची नियमित वारी करीत आहे. ते एकटेच सायकलने यात्रेसाठी निघतात. परतवाडा, धारणी मार्गे सातपुडाच्‍या पर्वतरांगा ओलांडून ते मध्‍यप्रदेशातून राजस्‍थानात पोहचतात. अजमेरला पोहचण्‍यासाठी त्‍यांना तब्‍बल बारा दिवस लागतात.

हेही वाचा >>> ‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’वरून ओळख वाढविताना सावधान!

भक्‍तीला मोल नसते, असे म्‍हणतात. शेख मुसा हे याच भक्‍तीच्‍या ओढीने दरवर्षी वेळ काढून अजमेरची यात्रा करतात. गेल्‍या १२ जानेवारीपासून त्‍यांचा अमरावतीहून सायकलने प्रवास सुरू झाला. ५५ किलोमीटर अंतरावरील अचलपूरला त्‍यांनी पहिला मुक्‍काम केला. त्‍यानंतर घाटरस्‍त्‍याने सेमाडोहला पोहचून त्‍यांनी मुक्‍काम केला. त्‍यानंतर धारणी येथे विश्रांती, अशी दरमजल करीत ते बारा दिवसांनी अजमेरला पोहचणार आहेत. साधारणपणे ते दिवसाला ८० ते १०० किलोमीटरचा प्रवास करतात आणि वाटेत एका गावी मुक्‍काम करतात. दररोज ते सकाळी ८ वाजता पुढील प्रवासासाठी निघतात आणि संध्‍याकाळपर्यंत मुक्‍कामाच्‍या ठिकाणी पोहचतात.

अजमेरला दर्ग्यावर चादर अर्पण केल्‍यानंतर ते पाच-सहा दिवस उरूसच्‍या निमित्‍ताने अजमेरला थांबून परतीच्‍या प्रवासासाठी निघणार आहेत. २००१ पासून ते अखंडपणे सायकलने अजमेरची वारी करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajmer in rajasthan sheikh musa 1800 kilometer cycling every year mma 73 ysh
First published on: 16-01-2023 at 11:17 IST