नागपूर : गेल्या काही दिवसांत परदेशात भारतीय विद्यार्थ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे परराष्ट्र मंत्रालयाचे सातत्याने लक्ष असले, तरी गेल्या सहा वर्षांत शिक्षणासाठी परदेशांत गेलेल्या ४०३ भारतीय विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याचे आकडेवारी सांगते. विशेष म्हणजे, मागील तीन वर्षांत २३ हजारांहून अधिक भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे.

परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून शिष्यवृत्ती किंवा तत्सम प्रकारची मदत केली जाते. मात्र, त्यांना अनेकदा सुरक्षेच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नैसर्गिक संकटे, अपघात आणि आरोग्य समस्यांसह इतर कारणांमुळे २०१८ पासून परदेशांत भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या ४०३ घटना घडल्या. सर्वाधिक मृत्यू कॅनडामध्ये (९१) झाले असून त्याखालोखाल ब्रिटन (४८), रशिया (४०), अमेरिका (३६), ऑस्ट्रेलिया (३५), युक्रेन (२१), जर्मनी (२०), इटली (१०) यांचा क्रमांक लागतो.

हेही वाचा : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत मायलेकीसह ३ ठार

या कालावधीत ३४ देशांमध्ये भारतीय विद्यार्थी मृत्युमुखी पडले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न फेब्रुवारीमध्ये संसद अधिवेशनात चर्चिला गेला होता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने नेहमीच तातडीने पावले उचलली असून संकटात असलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ परत आणण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात आल्याचे विद्यार्थी नेता वैभव बावनकर यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांत संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांसह २३,९०६ भारतीय नागरिकांची परदेशांतून सुटका करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील १४७० नागरिकांचा समावेश आहे.

हेही वाचा : यवतमाळ : सिमेंट स्टील गोदामात दरोडा; रखवालदाराची निर्घृण हत्या

सरकारच्या उपाययोजना

●विद्यार्थ्यांची नोंद ठेवण्यासाठी विशेष मोहीम
●प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाशी मिशनचे अधिकारी संपर्कात
●‘मदत’ पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल
●संकटकाळात आवश्यक ती मदत. गरज असल्यास घरवापसीसाठी मोहिमा