आज उद्घाटन, नाटय़दिंडीने गजबजणार शहर; देशभरातील नाटय़ कलावंत, रसिक शहरात दाखल

९९ व्या अखिल भारतीय मराठी  नाटय़संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून ६० तासांच्या या नाटय़जागराची अधिकृत सुरुवात उद्या शुक्रवारी दुपारी निघणाऱ्या नाटय़दिंडीने होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर रात्री १० वाजता ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक सादर होणार आहे.

या संमेलनात झाडीपट्टी रंगभूमीवर गाजलेले शिवराज कला रंगभूमी वडसातर्फे नाटक आक्रोश, बहुजन रंगभूमीचे गटार व कारंजा लाडमधील नाटय़ परिषद शाखेची राडा एकांकिका सादर होईल. नाटय़ परिषदेच्या सोलापूर शाखेच्यावतीने ‘विश्वदाभिरामा’ हा दीर्घाक,  इचलकरंजी शाखेच्यावतीने ‘अफू’ एकांकिका, सांगली शाखेच्यावतीने ‘तेरे मेरे सपने’, नाशिक शाखेच्यावतीने ‘तो ती’ आणि नाटक, अहमदनगर शाखेची लाली एकांकिका सादर होईल. शनिवारी दुपारच्या सत्रात आयोजित ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात वामन केंद्रे, अतुल पेठे, आशुतोष पोतदार आणि विभावरी देशपांडे सहभागी होणार आहेत. अध्यक्षस्थानी शफाअत खान असतील. दुसरा परिसंवाद ‘रंगभूमी : उणे मुंबई पुणे’ या विषयावर होणार आहे. यात सलीम शेख, विवेक खरे, डॉ. सतीश पावडे, डॉ. सतीश साळुंके, डॉ. दिलीप घारे, दत्ता पाटील, क्षितिज झावरे, रजनिश जोशी, हिमांशू स्मार्त, मुकुंद पटवर्धन आणि वानम पंडित सहभागी होणार आहेत. याशिवाय रुघुवीर खेडकरांसह कांताबाई सातारकर  यांचा लोकनाटय़ तमाशा, नाशिकच्या विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्यावतीने ‘विसर्जन’ हे दोन अंकी नाटक, नवरगावच्या बालाजी पाटील बोरकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने सदानंद बोरकर दिग्दर्शित ‘अस्सा नवरा नको गं बाई’ विनोदी नाटक, अमरावती शाखेच्यावतीने ‘मोमोज’ एकांकिका, नवोदित कलावंतासाठी एकपात्री सादरीकरण हा खुला कार्यक्रम,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनावर श्याम पेठकर लिखित आणि हरीश इथापे दिग्दर्शित ‘तेरव’ हा दीर्घाक, कोल्हापूरच्या कलावंतांचा गीतरामायण कार्यक्रम आणि शेवटच्या दिवशी २४ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता खुले अधिवेशन आणि संमेलनाचा समारोप होणार आहे. यावेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. समारोपानंतर रात्री आनंदवनच्या महारोगी सेवा समितीमधील कलावंतांचा ‘स्वरानंदनवन’ हा संगीतमय कार्यक्रम तर मध्यरात्री १ वाजता प्राजक्ता देशमुख दिग्दर्शित ‘मुक्ती’ हा कार्यक्रम सादर होऊन संमेलनाची सांगता होईल.

‘संमेलनाची वारी’ हे प्रमुख आकर्षण

नाटय़ संमेलनाच्या इतिहासातील संमेलनाध्यक्ष आणि ९९ व्या संमेलनाचे अध्यक्ष यांच्या कर्तृत्वाची दाखल घेणारा संमेलनाची वारी हा आगळावेगळा कार्यक्रम २४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सुरेश भट सभागृहात सादर होणार आहे. नागपूर शाखेने या कार्यक्रमची निर्मिती केली असून शहरातील २०० कलावंत यात सहभागी होणार आहेत.

चार हजार प्रेक्षक बसू शकतील असा भव्य शामियाना

सुरेश भट सभागृह आणि रेशीमबाग परिसरात हे संमेलन होणार आहे.  रेशीमबाग मैदानात भव्य मंडप उभारण्यात आले असून चार हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनात कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ  नये यासाठी तीनशेपेक्षा अधिक स्थानिक कलावंत व कार्यकर्ते दिवस-रात्र काम करीत आहेत. शहरात आमदार निवाससह शहरातील विविध हॉटेल्समध्ये बाहेरील रसिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. नाटय़ संस्कृतीचा वारसा रसिकांपर्यंत नेण्याचे काम संमेलनाच्या  माध्यमातून केले जात आहे त्यामुळे सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर व नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे यांनी केले आहे.