अकोला : जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह संततधार पाऊस सोमवारीदेखील सुरूच आहे. पूर्णा, काटेपूर्णा, उमा, पठार, गौतमा या नद्यांना पूर आला. अकोट तालुक्यातील झिंगापूर आंबोडा येथे भिंत कोसळून एका तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली.
श्रावणी प्रवीण शिरसाट (वय ३, रा. झिंगापूर आंबोडा, ता. अकोट) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अतिवृष्टीमुळे घडलेल्या या दुर्दैवी प्रकारामुळे हळहळ व्यक्त केली जात असून गावात शोककळा पसरली आहे.
रविवारी सायंकाळी पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट झाला. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी थांबले आहे. या पावसामुळे सर्वत्र जलमय परिसर झाला. पूर्णा, काटेपूर्णा, उमा, पठार, गौतमा या नद्यांना पूर आला असून लगतच्या गावांमध्ये पाणी शिरले. जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हजारो हेक्टर शेत जमिनीवर पावसाचे पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.