अकोला : भारिप-बमसंचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये चार वेळा पक्षांतर केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेत प्रवेश घेऊन पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढल्यानंतर आता ते पुन्हा एकदा भाजपच्या तंबूत दाखल झाले.

विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाने मोठ्या विश्वासाने त्यांना उमेदवारी दिल्यावरही पक्षांतर करतांना त्यांनी शिवसेनेच्या एकाही बैठकीला गेलो नसल्याचे म्हटले, तर भाजपच्या संघटन मंत्र्यांनी सिरस्कारांची इच्छा नसतांनाही त्यांना शिंदेसेनेकडून लढावे लागल्याचे विधान केले. या सर्व प्रकारावरून भाजप व शिवसेना शिंदे गटात ऐन निवडणुकीच्या काळात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

बळीराम सिरस्कार हे २००९ ते २०१९ सलग १० वर्ष भारिप-बमसंचे आमदार होते. त्यापूर्वी वंचितने त्यांना अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्षही केले होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना वंचित आघाडीने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिली होती. त्याठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बाळापूरची उमेदवारी वंचितने त्यांना नाकारली होती. त्यानंतर २०२० मध्ये त्यांनी वंचितचा हात सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला. मात्र, राष्ट्रवादीत ते फारसे रमले नाहीत.

त्यानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. बाळापूरमधून २०२४ ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढण्यासाठी ते इच्छूक होते. तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी पक्ष पातळीवर प्रयत्न केले. महायुतीतील जागा वाटपामध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटासाठी सुटली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या घराचे उंबरठे झिजवले. निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश करून त्यांनी बाळापूरमधून उमेदवारी देखील मिळवली. शिवसेना शिंदे गटाने पक्षातील अनेक इच्छुकांना डावलून बळीराम सिरस्कार यांच्यावर विश्वास दाखवला.

भाजपनेच बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेना शिंदे गटावर दबाव टाकल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. तिकीट व सत्तेसोबत राहण्यासाठी राजकीय कोलांटउड्या मारणाऱ्या माजी आमदार बळीराम सिरस्कार यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला. ते तिसऱ्या स्थानी घसरले.

दरम्यान, पराभवानंतरही ते शिवसेना शिंदे गटात सक्रिय राहिले नाहीत. शिवसेनेत असतांनाही ते भाजप नेत्यांच्या संपर्कातच होते. अखेर त्यांनी नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश घेतला. पाच वर्षांत वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि परत भाजप असा त्यांचा प्रवास राहिला.

शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढल्यानंतर एकदाही पक्षाच्या बैठकीला गेलो नसल्याचे बळीराम सिरस्कार म्हणाले. भाजपचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी बळीराम सिरस्कार यांची इच्छा नसतांनाही त्यांना शिंदेंच्या तिकिटावर लढावे लागल्याचे वक्तव्य केले. ऐन स्थानिक निवडणुकीत या राजकीय घडामोडीमुळे भाजप व शिंदे गटात तणाव वाढण्याची शक्यता आहे.