अकोला : अत्यंत संवेदनशील अकोला शहरात पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. वाहन ठेवण्याच्या किरकोळ वादातून दोन शेजाऱ्यांनीच एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना शहरातील भांडपुरा भागात शनिवारी रात्री घडली. या वादातून तरुणाने तलवार काढून दहशत पसरण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन अकोला पोलिसांनी केले.

अकोला शहरात किरकोळ वादातून तणावाची परिस्थिती निर्माण होणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांपासून वारंवार घडत आहेत. १४ एप्रिलला मध्यरात्री वाशीम बायपास चौकात क्षुल्लक कारणावरून दगडफेक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भांडपुरा परिसरात दोन गटातील वादातून दगडफेक झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला आहे. जुने शहरातील हा भाग संवेदनशील म्हणून ओळखला जातो. शनिवारी रात्री पुन्हा एकदा या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भांडपुरा परिसरात शनिवारी रात्री दोन गटात वाद झाला. वाहन ठेवण्याच्या कारणामुळे शेजाऱ्यांमध्ये आपसी वाद झाल्याच्या कारणावरून दोन गटाकडून परिसरात दगडफेक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

या दगडफेकीनंतर एका गटातील तरुणाने हातात तलवार घेऊन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांच्या ताफ्याने घटनास्थळावर धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळावर दाखल झाले होते. दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. अकोला पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून परिसरात शांतता प्रस्थापित केली. तलवार घेऊन दहशत फसवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दगडफेकीच्या घटनेमुळे जुने शहरातील भांडपुरा भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून परिसरात शांतता निर्माण केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आहे. भांडपुरा परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. शहरात संपूर्णपणे शांतता असून जनजीवन सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन अकोला पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती व अफवा पसरवू नये, अन्यथा त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील अकोला पोलिसांनी दिला आहे.