अकोला : संततधार पावसामुळे अकोला जलमय झाला आहे. मेघगर्जनेसह रात्रभर काही भागात मुसळधार, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच होता. जिल्ह्यात सरासरी ४९.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. तेल्हारा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वरुणराजाचा बरसत आहे. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील विविध भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस होता.

सायंकाळनंतर पावसाने जोर पकडला. जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे सर्वत्र जलमय परिसर झाला आहे. नदी, नाले भरभरून वाहन असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील खरप ढाेरे गावाला पुराने वेढा घातला होता. जिल्ह्यात काल १२९ मि.मी. सरासरी पाऊस पडल्याचे नोंद झाली. बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत ४९.१ मि.मी. सरासरी पाऊस कोसळला असून सर्वाधिक १०३.८ मि.मी. पाऊस तेल्हारा तालुक्यात झाला आहे. अकोट ३०.६, बाळापूर ४१.८, पातूर ३५.५, अकोला ४८.१, बार्शिटाकळी ५६.७ आणि मूर्तिजापूर तालुक्यात ३५.७ मि.मी. पाऊस पडला आहे. खरीप हंगामासाठी हा पाऊस पोषक ठरत आहे.