अकोला : इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाद्वारे नोंदणीकृत सदस्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा राखीव निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला. त्यामुळे कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी मंडळाच्या योजना टप्या-टप्याने बंद करण्याचा घाट घातला जात आहे, असा गंभीर आरोप कामगार संघटनांनी केला आहे. यामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अकोल्यात या विरोधात कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली. असंघटित मजुर संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्य शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळावतीने असंघटित मजुरांसाठी ३२ प्रकारच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. मात्र, मंडळाचा राखीव निधी लाडकी बहिण योजनेमध्ये वळता केल्यामुळे असंघटित मजुरांना दिल्या जाणाऱ्या हक्काच्या योजना टप्या-टप्याने बंद केल्या जात आहेत, असा कामगारांचा आरोप आहे. राज्य सरकारची ही अयोग्य भूमिका आहे. कल्याणकारी मंडळाद्वारे मजुरांच्या हितासाठी लागू केलेल्या शैक्षणिक व विकासात्मक योजना निरंतर चालू ठेवण्याच्या मागणीसाठी आज, १२ ऑगस्टला कामगार कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

बिल्डिंग कामगार, मजूर असोसिएशन, बिल्डिंग पेंटर्स, बांधकाम मजूर असोसिएशन, कल्याणकारी मजूर असोसिएशन, इमारत व इतर मजूर असोसिएशन, एकता असंघटित बांधकाम मजूर असोसिएशन, श्रमिक गर्जना फाउंडेशन, क्रांतिकारी मजूर असोसिएशनसह १५ संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समितीच्यावतीने अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या आंदोलनाला इंटकचे प्रदीप वखारिया यांच्यासह अनेकांनी भेट देऊन कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. राज्य शासन कामगारांच्या हिताचे नसल्याची टीका प्रदीप वखारिया यांनी केली. आंदोलनात कृती समितीचे पदाधिकारी, सदस्यांसह असंख्य कामगार, महिला मजूर सहभागी झाले होते.

काँग्रेस आमदार प्रश्न उचलणार

धरणे आंदोलनाला अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी भेट देऊन कामगारांच्या मागण्या जाणून घेतल्या. आगामी विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेसचे आमदार बांधकाम मजुरांच्या विविध योजना टप्पा टप्पाने बंद का केल्या जात आहेत? असा प्रश्न शासन दरबारी उपस्थित करणार आहे. मजुरांना न्याय देण्यासाठी काँग्रेस लढा देईल, असे आमदार साजिद खान पठाण यांनी कामगारांना आश्वासन दिले.