अकोला : औषध विक्रीच्या दुकानात कागदात गुंडाळून गर्भपाताच्या गोळ्यांची सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार अकोट येथे उघडकीस आला. गर्भपाताच्या औषधांची विनादेयक खरेदी-विक्री केल्या जाते. याप्रकरणी औषध प्रशासन विभागाने बनावट ग्राहक पाठवून संबंधित गोरखधंद्याचा पर्दाफाश केला. अकोट येथील मेडिकल चालकासह दोन भावांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक मनीष गोतमारे यांनी अकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जिल्हा शल्य चिकित्सकांनी २७ जूनला औषध प्रशासन विभागाला पत्र देऊन अकोट येथील ‘टावरी मेडिकल स्टोअर्स’मध्ये अवैधरित्या गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्या जात असल्याचे कळवले. या माहितीवरून ३ जुलैला अकोट येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री भुईभार, विधि समादेशक ॲड. शुभांगी ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक जाधव यांच्यासह दोन पंचानी अकोट गाठले.

रेल्वेस्थानक मार्गावरील डॉ. केला रुग्णालयाजवळील ‘टावरी मेडिकल’मध्ये बनावट ग्राहकाला पाठविण्यात आले. गर्भपाताच्या गोळ्याची मौखिक मागणी केल्यावर मेडिकलमधील महिला कर्मचाऱ्याने एक भ्रमणध्वनी क्रमांक दिला. त्यावर संपर्क करून गर्भपाताच्या गोळ्यांची मागणी करण्याचे सूचवले. काही वेळाने पंकज टावरी हा मेडिकलच्या दुकानामध्ये येऊन त्याने बनावट ग्राहकाला चार लांब व एक गोल गोळी कागदात गुंडाळून दिली व एक हजार रुपये घेतले. दबा धरून बसलेल्या पथकाने छापा टाकून पंकज टावरीची चौकशी केली. आरोपीकडून औषध व ५०० रुपयांच्या दोन नोटा जप्त केल्या.

औषध देणारा व्यक्ती कोण?

‘टावरी मेडिकल’ हे बिपीन टावरी याच्या नावावर असून अधिकृत औषध विक्रेता म्हणून त्याची नोंद आहे. औषध विक्री दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. बिपीन टावरी याला नोटीस बजावून गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी व त्याच्या देयकाची विचारणा करण्यात आली. नमुने चाचणी व विश्लेषणासाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवले. ७ जुलैला कारणे दाखवा नोटीसही बजावली. त्यावर पंकज टावरी याने पत्र देऊन प्रकरणाशी कुठलाही संबंध नसून औषध देणारा व्यक्ती कर्मचारी देखील नाही व गर्भपाताच्या औषधांची खरेदी-विक्री केल्या जात नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे औषध देणारा व्यक्ती कोण, असा प्रश्न समोर आला आहे.

दोघांवर गुन्हे

चौकशीमध्ये पंकज टावरी याने कागदात गुंडाळून अवैधरित्या गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करून कायद्याचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. गर्भपाताचे औषध विनादेयक खरेदी करणे, डॉक्टरांच्या चिठ्ठीविना औषध विक्री करणे, प्रकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास टाळाटाळ करणे या प्रकरणी बिपीन टावरी व पंकज टावरी यांच्यावर अकोट पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये १३ ऑगस्टला गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात गर्भपाताच्या औषधांची खरेदी व त्याच्या विक्री संदर्भात चौकशी केली जात आहे.