अकोला : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर पालिका व नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच महापालिकेच्या सार्वत्रित निवडणुका घेण्याची तयारी सुद्धा जोमाने सुरू करण्यात आली. अकोला महापालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्या आली. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मान्यतेची मोहर उमटवली आहे.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांचे आरक्षण नव्याने काढण्यात आले. त्यानंतर निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे. आरक्षण निश्चित झाल्याने आता महापालिका निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या होत्या. न्यायालयाच्या निकालानंतर ‘स्थानिक’ निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. पहिल्या टप्प्यात नगर पालिका व नगर पंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला. या निवडणुकीची धामधूम सुरू असतांनाच महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुद्धा वेग आला.
अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ११ नोव्हेंबर रोजी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्व साधारण प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. ते राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती (महिला) तसेच नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या आरक्षणाची सोडत मान्य करून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्व साधारण महिला आरक्षण पुन्हा सोडतीद्वारे निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार महापालिका प्रशासनाद्वारे मुख्य सभागृहात आरक्षण सोडत नव्याने काढण्यात आली. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्व साधारण (महिला) प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केले. ते राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केले. या आरक्षणास १८ नोव्हेंबर रोजी मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाच्या अवर सचिवांच्या स्वाक्षरीचे पत्र अकोला महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले.
हरकती व सूचना सादर करता येणार
आता आरक्षणावरील हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरक्षण अंतिम करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यानुसार प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागण्यासाठी १९ ते २५ नोव्हेंबर हा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधीत नागरिकांनी महापालिकेच्या निवडणूक विभागात हरकती व सूचना सादर कराव्यात, असे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले.
