अकोला : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खबरदारी म्हणून आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ नुसार ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आदी साधने वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी हा आदेश जारी केला. तो ३ जूनपर्यंत कायम राहणार असून ड्रोनचा वापर करता येणार नाही.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आहे. ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम मधील बैसरन भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार केले. पर्यटकांवरील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले. भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविण्यात आले. आता त्याला स्थगिती देण्यात आली आहे. तथापि, दहशतवाद्यांचे ‘स्लीपर सेल्स’ सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात संघर्ष झाल्यास ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानवी जीवन धोक्यात न आणता रिअल-टाइम इंटेलिजन्स, पाळत ठेवणे आणि लष्करी निरीक्षण, अचूक हल्ले आणि शत्रूची अस्त्रे नष्ट करणे आदी गोष्टींसाठी तुलनेने ड्रोनचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आदी साधने वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आली आहे. त्यानुसार ड्रोन, रिमोट नियंत्रित मायक्रो लाईट, एअरक्राफ्ट, पॅरामोटर, हँगग्लायडर, हॉट एअर बलून अशी साधने बाळगताना किंवा वापरताना आढळल्यास संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश अकोला जिल्ह्याच्या हद्दीत ३ जूनपर्यंत लागू राहणार आहे. या बंदीच्या काळात ड्रोनचा वापर करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. या आदेशाची जिल्ह्यात कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहशतवाद हिंसाचारविरोधी दिवसानिमित्त शपथ

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी २१ मे रोजी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ साजरा केला जातो. यानिमित आज जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक शपथ घेतली. दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतीज्ञा सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.