अकोला : रेल्वे सुरक्षा दलावर रेल्वे मालमत्ता, रेल्वे स्थानकांची आणि गाड्यांमधील आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरक्षेची जबाबदारी असते. गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे अनेक छापे टाकले. ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वे आरपीएफने रेल्वे कायद्याच्या विविध कलमांखाली ८१८४ गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला आहे. दंड म्हणून गुन्हेगारांकडून ३८.०३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास केल्याबद्दल रेल्वे कायद्याच्या कलम १६२ अंतर्गत २४३ जणांवर गुन्हा दाखल करून दंड म्हणून ६२ हजार २०० रुपये वसूल केले. रेल्वे मालमत्तेची चोरी केल्याबद्दल रेल्वे मालमत्ता (बेकायदेशीर ताबा) कायद्यांतर्गत ५९ जणांवर गुन्हा दाखल करून चोरीच्या वस्तूंसह दंड म्हणून ४.६२ लाख रुपये वसूल करण्यात आले. ८.२१ लाख रुपये किमतीची दारू, गांजा आणि तंबाखूजन्य पदार्थ बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल १७ जणांवर गुन्हा दाखल केला. प्रवाशांच्या सामानाची चोरी आणि प्रवाशांविरुद्धच्या इतर गुन्ह्यांसाठी १६१ जणांना अटक केली.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुनिश्चित करण्यासाठी आरपीएफने अनेक उपाययोजना केल्या आहेत. रेल्वे परिसरात आणि गाड्यांवरील हालचालींवर आरपीएफ त्यांच्या सीसीटीव्ही देखरेख प्रणालीद्वारे २४ तास लक्ष ठेवते जाते. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांद्वारे वंदे भारत गाड्या, राजधानी एक्सप्रेस, मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर गस्त वाढविण्यात आली आहे. गर्दीच्या वेळी पहिल्या आणि शेवटच्या डब्यात आरपीएफ कर्मचारी तैनात केले जातात. चोरांवर लक्ष ठेवता येईल, जे सामान्यतः स्थानकांवरून गाडी निघाल्यावर हल्ला करतात. ईएमयू रेक्सच्या सर्व ७८८ महिला कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. आपत्कालीन टॉक बॅक (ईटीबी) प्रणाली स्थापित केली.
दिल्ली येथील घटनेनंतर उपाययोजनांमध्ये वाढ
दिल्ली येथील स्फोट प्रकरणानंतर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात प्रवासी, रेल्वे कर्मचारी तसेच रेल्वेची महत्त्वाची साधनसंपत्ती सुरक्षित राहण्यासाठी सर्वंकष सुरक्षा उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. विभागात सर्वत्र उच्चतम सतर्कतेची पातळी लागू करण्यात आली असून सर्व रेल्वेस्थानकावर व कार्यक्षेत्रांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. भुसावळ विभाग स्थानिक पोलीस प्रशासन व गुप्तचर यंत्रणांशी सतत संपर्क ठेवून माहितीचे आदानप्रदान आणि जलद प्रतिसाद सुनिश्चित करीत आहे. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे तसेच कुठलीही संशयास्पद हालचाल अथवा वस्तू दिसल्यास तत्काळ कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
