अकोला : शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू विभागात भरती प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. मर्जीतील विशिष्ट निविदाधारकाला लाभ देण्यासाठी हा गैरप्रकार करण्यात आल्याचे समोर आले. यावरून जबाबदार अकोला जिल्हा शल्य चिकित्सकांसह तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली. या कारवाईमुळे आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोग्य विभागातील अनियमितता, गैरव्यवहार, नियमबाह्य कामे नेहमीच चर्चेत असतात. आरोग्य विभागाच्या अकोला मंडळांतर्गत येणाऱ्या अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात भरती प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणात तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आज त्याचे आदेश धडकले.
अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात शिशू अतिदक्षता विभागासाठी सन २०२४-२५ मध्ये ३१ जागा भरण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेतील घोळ झाल्याचे समोर आले आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया नियमबाह्य आणि अतांत्रिक पद्धतीने केल्यावरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जयंत पाटील यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार समितीने प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन चौकशी केली. या संदर्भात समितीने आपला अहवाल सादर केला.
चौकशी समितीच्या त्या अहवालातून निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचार उघड झाला आहे. भरतीच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार व नियमबाह्य कामे केल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कठोर भूमिका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. आरोग्यमंत्र्यांच्या आदेशावरून जबाबदार सी.एस.सह तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली. तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर आता त्यांची विभागीय चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.
आ. श्याम खोडेंनी उपस्थित केला होता प्रश्न
जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू विभागातील भरतीच्या निविदा प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करून वाशीमचे भाजप आमदार श्याम खोडे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गैरवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता. यात आपल्या मर्जीतील लोकांना कंत्राट मिळण्यासाठी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचे समोर आले होते. दरम्यान आता त्या प्रकरणामध्ये कारवाई झाली आहे.