अकोला : श्रावणमासातील आगळा-वेगळा उत्सव म्हणून अकोल्यातील प्राचीन कावड-पालखी महोत्सवाने आपली विशिष्ट ओळख जपली. हा महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य भारतातील शिवभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. आज, शेवटच्या श्रावण सोमवारी कावड महोत्सवात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला हजारो भरण्याचा जलाभिषेक केला जात आहे. शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आले असून सर्वत्र ‘हर हर महादेव’चा गजर सुरू आहे.

श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी सर्वत्र भाविकांची गर्दी असते. अकोल्यातील राजराजेश्वराचा कावड महोत्सव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक जमतात. राज्यात अन्य कुठल्याच शहरात कावड महोत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात व विविधांगी स्वरूपात साजरा होत नाही. १९४४ मध्ये अकोल्यात दुष्काळ पडला होता. त्यावेळी श्री राजराजेश्वराला साकडे घालून कावड व पालखी महोत्सवाची परंपरा सुरू करण्यात आली. ८१ वर्षांपासून ही प्रथा चालत आली आहे.

शेवटच्या श्रावण सोमवारी अकोला शहरापासून सुमारे १९ किलोमीटरवरील गांधीग्राम (वाघोली) येथील पूर्णा नदीतून पाण्याने भरलेल्या घागरी कावडीला बांधल्या जातात. ही भव्यदिव्य कावड शिवभक्त खांद्यावर घेऊन पायी चालत येतात. एकामागे एक अशा शेकडो कावडांनी गांधीग्राम ते अकोलापर्यंतचा रस्ता व्यापून घेतला. एका रांगेत येणाऱ्या या मोठ्या कावडधारी पालख्या खूपच सुंदर व आकर्षक दिसत आहेत. अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या पालखी सोहळ्यात अगदी भक्तिभावाने सहभागी झाले.

सर्वांत मोठी कावड आणण्यासाठीही मंडळांमध्ये स्पर्धा रंगली. अनेक शिवभक्त मंडळांनी शिवशंकराच्या विविध रूपांचे देखावे महोत्सवात साकारले आहेत. बाबा अमरनाथ, त्र्यंबकेश्वर, भैरवनाथ, राजराजेश्वर, ओंकारेश्वर आदी रूपे उत्सवात दिसून आले. या सर्व पाण्याने भरलेले भरणे बांबूंनी बांधलेल्या एका ढाच्यावर लटकवून त्या खांद्यावरून वाहून हे हजारो शिवभक्त अकोल्यातील राजेश्वर मंदिरात दाखल होत आहेत.

भरण्यातील पाण्याने महादेवाला जलाभिषेक घातला जात आहे. या कावडधारी शिवभक्तांसाठी गांधीग्राम ते अकोला या रस्त्यावर स्वयंसेवी संघटनातर्फे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले. ढोल-ताशाच्या निनादात, गुलाल उधळत, ‘हर हर महादेव…’च्या गजरात खांद्यावर काही क्विंटलचे ओझे घेऊन शिवभक्त मोठ्या आनंदात महोत्सव सहभागी झाले. शहरातील कावड व पालखी महोत्सवाच्या संपूर्ण मार्गाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

२५० च्यावर कावड व पालखींचा सहभाग

अकोल्यातील कावड व पालखी महोत्सवांमध्ये २५० च्यावर छोटे-मोठे मंडळ सहभागी झाले आहेत. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नेत्रदिपक कावड यात्रा भर पावसात सुरू आहे. मंडळांनी साकारलेले देखावे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

चोख सुरक्षा व्यवस्था

कावड व पालखी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गांधीग्रामसह शहरात विविध ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. ४४१ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून १० ड्रोन कॅमेरांद्वारे नजर ठेवली जात आहे. सुरक्षा व्यवस्थेत ११० अधिकाऱ्यांसह अडीच हजार पोलीस तैनात आहेत.