अकोला : मतदार यादीतील घोळावर बोट ठेवून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’चा गंभीर आरोप केला. यावर भाजपने राहुल गांधींवर पलटवार केला. मात्र, याआधी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप अकोला भाजपनेच करून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

‘मत चोरी’ प्रकरणावरून भाजप व काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये वाकयुद्ध रंगत असले तरी दोन्ही पक्षांच्या तक्रारीत साम्य असल्याचे चित्र आहे. राहुल गांधींनी केलेल्या आरोपानंतर केंद्रीय व स्थानिक भाजपच्या भूमिकेमध्ये विरोधाभास दिसून येतो. सोबतच ‘अकोला पश्चिम’ मध्ये विजय मिळवणाऱ्या काँग्रेसला येथील मतदार यादीतील कथित घोळ मान्य आहे का, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

मतदारांचे खोटे पत्ते, एकाच पत्त्यावर अनेक मतदार, एकाच मतदाराकडून अनेक मतदान केंद्रांवर मतदान, छायाचित्रांमध्ये गोंधळ, नकली नावे मतदार असे प्रकार आढळल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या या आरोपाचे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटले. ‘राहुल गांधींचे लोकशाही विरोधात कारस्थान असून ते संविधानिक संस्थांना बदनाम करण्याचे काम करीत आहेत,’ अशी टीका भाजपने केली. मात्र, अकोल्यात भाजपने याच प्रकारे निवडणूक आयोगाकडे  तक्रारी केल्या आहेत.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपला ३० वर्षांनंतर पराभवाचा धक्का बसला. या मतदारसंघातून काँग्रेसने काठावर विजय मिळवला. ‘अकोला पश्चिम’ मतदारसंघातील मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप भाजपने केला. ‘अकोला पश्चिम’ मध्ये २८ हजारावर दोनदा, तिनदा नावे आहेत. इतर मतदारसंघातील नावांचाही या मतदारसंघात समावेश आहे, अशी तक्रार भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली.

या संदर्भात पडताळणी करून दुसऱ्या मतदारसंघातील व दोनदा आलेली नावे वगळण्याची मागणी करण्यात आली आहे. या मतदारसंघामध्ये २८ हजार पेक्षा जास्त मतदारांची नावे मतदार यादीमध्ये दोनदा समाविष्ट झाली. बाळापूर मतदारसंघातील हजारो नावांचा समावेश देखील ‘अकोला पश्चिम’मध्ये आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे पुरावे सुद्धा सादर करण्यात आल्याचा दावा भाजपने केला. खासदार अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून सुद्धा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

निष्पक्ष चौकशी अपेक्षित

राहुल गांधी देशाचे एक जबाबदार नेते आहेत. जनतेच्यावतीने त्यांनी निवडणुकीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्यावर योग्य उत्तर निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे. मतदार यादीत घोळ असल्यास ती कुठलीही असली तरी त्याची निष्पक्षपणे चौकशी करावी, असे मत ‘अकोला पश्चिम’चे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी व्यक्त केले.

मतदार यादीतील नावांसंदर्भात तक्रार

‘अकोला पश्चिम’मध्ये इतर मतदारसंघातील नावांचा समावेश व अनेक मतदारांची नावे दोनदा तीनदा असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेस व आमच्या तक्रारीत समानता नाही, अशी भूमिका तक्रारकर्ते भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी मांडली. राहुल गांधींनी केलेल्या आरोपाप्रमाणेच मतदार यादीतील घोळामुळे ‘अकोला पश्चिम’मध्ये काँग्रेसचे साजिद खान पठाण यांचा विजय झाला आहे का? असा सवाल भाजपचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी केला.