अकोला : जिद्द, चिकाटी, ध्येय, निष्ठा व समर्पणाचे उत्तम उदाहरण म्हणजे अकोल्यातील ज्येष्ठ सर्पमित्र तथा मानत वन्यजीव रक्षक बाळ काळणे. सर्पसेवा, निसर्गसृष्टी व जनजागृतीच्या ध्येयाने झपाटलेले बाळ काळणे यांनी कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला लढा दिला. ७९ टक्के दिव्यांगत्व आले. त्यापुढे हतबल न होता त्यांनी आपल्या कार्याला आणखी व्यापक स्वरूप दिले. गेल्या २७ वर्षांपासून त्यांनी तब्बल २० हजारांवर सापांना जीवदान दिले. कर्करोगाशी कडवी झुंज देतानाही त्यांनी सर्पसेवा अविरत सुरू ठेवली. कर्करोगावर मात केल्यावर निसर्गसृष्टीच्या संरक्षणासह समाजप्रबोधनाच्या कार्यरत त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनी आपल्या कार्यातून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
साप हा देखील निसर्गचक्राचा एक भाग असून त्याच्या संरक्षणाचे कार्य बाळ काळणे गत २७ वर्षांपासून करीत आहेत. जीवनात काही तरी वेगळे करण्याचे ध्येय व निसर्गाची आवड यातून बाळ ऊर्फ जयदीप काळणे यांना सर्पसेवेची प्रेरणा मिळाली. स्वयंस्फूर्तीने त्यांनी साप पकडण्याची कला अवगत केली.
निष्णात सर्पमित्र होत त्यांनी आतापर्यंत अत्यंत विषारी नाग, घोणस, मण्यारसह विविध प्रकारच्या सुमारे २० हजारावर सापांना जीवदान दिले. सापांना पकडून जंगलात सोडण्यासोबत त्यांनी समाजामध्ये जनजागृतीही केली. अनेक वेळा स्वत:चा जीव धोक्यात घालत सापांसोबतच अनेक वन्यप्राण्यांचाही त्यांनी जीव वाचवला. या कार्याची दखल घेऊन शासनासह विविध संस्था, संघटनांच्या असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. मानद वन्यजीव रक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
सर्पसेवा, निसर्गसृष्टी व समाजसेवेसाठी आपले जीवन झोकून दिले असतानाच काळणे यांना कर्करोगसारख्या गंभीर आजाराने २०१८ मध्ये ग्रासले होते. जीभ आणि घशाचा कर्करोग झाल्याने जीव धोक्यात आल्यावरही परिस्थिती पुढे खचून न जाता त्यांनी आपली सर्प व समाजसेवा अखंडितपणे सुरूच ठेवली. आजारांशी लढा देतानाच त्यांनी अनेक सापांना पकडून जंगलात सोडले. २०१९ मध्ये त्यांनी कर्करोगावर मात केली. ७९ टक्के अपंगत्व आल्यावर देखील त्यांनी आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही. कर्करोगावर जनजागृती करून रुग्णांचे मनोबल वाढवण्याचे अनमोल कार्य ते करतात. समाज व निसर्ग सेवेप्रतीची बाळ काळणेंची तळमळ निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे.
दुर्मीळ अलबिनो, असंख्य अजगर, प्राण्यांना वाचवले
बाळ काळणे यांनी चार मोठे अजगर एकाचवेळी एकाच ठिकाणी वाचवून आतापर्यंत एकूण ५३ अजगरांना जीवदान दिले आहे. अशी कामगिरी करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव सर्पमित्र आहेत. अत्यंत दुर्मीळ अलबिनो सहा साप, चार ‘इंडियन एग इटर’, १२ मांडुळ साप आदींनाही त्यांनी पकडून जंगलात सोडले. यासोबत त्यांनी माकड, कोल्हे, काळवीट, अस्वल आदींसह अनेक वन्यप्राणी व पक्ष्यांचे जीव वाचवले आहेत.