अकोला : कृषिप्रधान संस्कृतीतील महत्वाचा सण म्हणजे पोळा. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरमुळे बैलांचे कृषी क्षेत्रातील कार्य कमी झाले तरी शेतकऱ्यांकडून आजही परंपरेनुसार बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण उत्साहात साजरा केला जातो. आपल्याला विश्वास बसणार नाही, पण अकोला जिल्ह्यातील अकोट येथे चक्क गाढवांचा पोळा भरवला जातो. पोळ्याच्या दिवशी बैलांप्रमाणेच गाढवांची सजावट करून त्यांच्या मानसन्मानासह पोळा भरवण्याची अनोखी परंपरा ५० वर्षांपासून अकोटमध्ये जोपासण्यात येत आहे. संपूर्ण देशात बैलांचा पोळा भरवला जात असतांना अकोटमधील गाढवांच्या पोळ्याने आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे.

पोळा म्हटले की डोळ्यापुढे येतो, शेतकऱ्यांच्या साथीने कष्ट करणारा बैल. अकोट येथे मात्र या सणाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. एक आगळी-वेगळी परंपरा शहरात सुमारे ५० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. अकोटमध्ये गाढवांचा पोळा वेगळ्या परंपरेतून साजरा केला जातो. पोळा सणानिमित्त बैलांप्रमाणे गाढवांची पूजा-अर्चा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. गाढवांना धुवून त्यांच्या शरीरावर रंगीबेरंगी सजावट केली जाते. पारंपरिक ढोल-ताश्यांचा गजरात गाढवांच्या पोळ्याचा अनोखा उत्सव साजरा करण्यात येतो. बैलांप्रमाणेच गाढव मानवाच्या हितासाठी वर्षभर ओझे वाहत असतो. श्रम सन्मान करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी गाढवांची पूजा केली जाते. बैल पोळ्यासारखा गाढवांचा पोळा भरवण्यात येतो. पूजा करून त्यांचा मानसन्मान केला जातो. गाढवांच्या कष्टामुळे होणाऱ्या कामातून अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे गाढवाच्या ऋणातून उतराई होण्यासह त्यांचे उपकार फेडण्यासाठी पोळ्यानिमित्त गाढवाचा सन्मान करण्याची परंपरा अकोटमध्ये पडली. गेल्या पाच दशकांपासून ही परंपरा जोपासली जात आहे.

या अनोख्या पोळ्यांच्या परंपरेविषयी नागरिकांना आकर्षण लागले असते. १२ महिने येथील नागरिक गाढवांच्या कष्टामुळे होणाऱ्या कामातून आपला उदरनिर्वाह करतात. त्याची परतफेड म्हणून बैलपोळा साजरा करण्याऐवजी गाढवांचा पोळा साजरा केला जातो. त्यांची आकर्षक सजावट करून गाढवांची पुजा केली जाते. त्यांना गोड व अन्य पदार्थांचा नवैद्य दाखवला जातो. सन्मानाने गाढवांना खाऊ घातले जाते. हा गाढव पोळ्याचा उत्सव केवळ अकोट शहरात साजरा केला जातो. वडिलोपार्जित असलेली ही परंपरा आजही त्याच भावनेने जोपासली जात आहे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. गाढवांच्या या अनोख्या पोळ्याची चांगलीच चर्चा होत असते.