भंडारा : आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी त्यांच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे या नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात महायुतीचे मित्रपक्ष असलेले भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीने एकमेकांच्या विरोधातच दंड थोपटले असून भंडारा जिल्ह्यात महायुतीला तडा गेला आहे.
महायुतीतील घटक पक्ष भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या भंडारा, पवनी, तुमसर आणि साकोली या चारही नगरपालिका स्वबळावर लढण्याची भाषा करत स्वतंत्र उमेदवार उभे केले आहे. काहीच महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत एकमेकांसाठी प्रचार करणारे तीनही पक्षांचे नेते या नगरपालिका निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले असून एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यामुळे नेमके कुणाला मतदान करायचे याबाबत आता मतदार संभ्रमित झाले आहे.
या निवडणुकीत महायुतीतील पक्षांमध्ये मतभेद उफाळल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, भाजपने जिल्हास्तरावर “स्वबळाचा नारा” दिल्यानंतर युतीची शक्यता संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हे तिन्ही पक्ष स्वतंत्र उमेदवारांसह मैदानात उतरले आहे.
भंडारा नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या मधुरा मदनकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या सुषमा साखरकर तर शिवसेना (शिंदे गट) अश्विनी भोंडेकर यांनी एकमेकांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. तुमसरमध्ये भाजपचे माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे अभिषेक कारेमोरे तर शिवसेना (शिंदे गट) कल्याणी भुरे या “आमने-सामने” दिसणार आहेत. या नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक नाराजी नाट्य रंगले आहे. भाजपच्या कल्याणी भुरे यांनी भाजपमध्ये महिलांना संधी नाही असे म्हणत धनुष्यबाण हाती घेतला आणि निवडणुकीच्या मैदानात उतरल्या. तर भाजपचे प्रदीप पडोळे यांनी यापुढे मी सामान्य कार्यकर्ता म्हणूनच पक्षात राहणार” अशी “नौटंकी” करत थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वतःच्या पदरी पाडून घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी नाट्य विकोपाला गेले असून अनेकांनी विद्रोह केला आहे.
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांच्या विरोधात प्रचार करणारे अभिषेक कारेमोरे यांना उमेदवारी दिल्यावरून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी उफाळून आली आहे. पवनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपने भावना भाजीपाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला असून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपमधून आयात झालेल्या विजया नंदुरकर यांना उमेदवारी दिली आहे तर शिंदे शिवसेनेने प्रगती बावनकर यांना हिरवी झेंडी दाखवली आहे. साकोली नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या देवर्षी कापगते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती लंजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे वृत्त लिहीपर्यंत शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराचे नाव जाहीर झालेले नव्हते.
नगरपालिकेची निवडणूक ही ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे बोलले जाते मात्र भंडारा जिल्ह्यात ही निवडणूक कार्यकर्त्यांची राहिली नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल, भाजपचे नेते आमदार परिणय फुके आणि शिंदे सेनेचे नेते आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीतील हे तीनही नेते परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी झाले असून या निवडणुकीत एकमेकांविरोधातच रणशिंग फुंकले आहे. महायुतीत झालेली ही बिघाडी काँग्रेससाठी फायद्याची ठरणार का अशी चर्चा ही आता रंगू लागली आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादीचेच उमेदवार रिंगणात दिसत आहे.
काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांच्यासाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. भंडारा, पवनी, साकोली आणि तुमसर नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी विद्रोह करत अपक्ष रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. असे असले तरी निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा कोणता पक्ष एकमेकांशी हात मिळवणे करेल याचा मात्र नेम नाही.
