अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोन शाखांमध्ये सायबर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तातडीची बैठक बोलावून यासंदर्भात सायबर हल्ला रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हा बँकेत सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची वार्ता पसरल्यानंतर खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या सायबर हल्ल्यात बँकेच्या बडनेरा आणि मंगरूळ दस्तगीर येथील शाखांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शनिवारी बँकेच्या संचालक मंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली. बँकेतील विरोधी आघाडीतील अकरा संचालकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज पत्र लिहून बैठकीतील मतांची प्रोसिडिंगमध्ये नोंद घेण्याची विनंती केली. बँकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि खातेदारांच्या रकमेला हानी पोहचून बँक अडचणीत येऊ नये, यासाठी अतिशीघ्र निर्णय घ्यावा. बँकेचा डेटा प्रभावित होऊन बँकेची आर्थिक हानी होऊ नये, यासाठी आमची सहमती आहे, असे सांगताना या विरोधक संचालकांनी काही प्रश्न उपस्थित केले.

त्यात बँकेमध्ये सायबर धोरण केव्हा अस्तित्वात आले, सॉफ्टवेअर घेण्यात आले, तेव्हा ही बाब कंपनीने लक्षात आणून दिली नाही का, आजपर्यंत उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत. बँकेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठका का घेण्यात आल्या नाहीत, वैध संगणक समिती नियुक्त का केली नाही, डेटा केंद्र तयार करताना संरक्षणात्मक उपाययोजना का केली नाही, असे प्रश्न संचालक खासदार बळवंत वानखडे, बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप, सुधाकर भारसाकळे, सुरेश साबळे, हरीभाऊ मोहोड, दयाराम काळे, श्रीकांत गावंडे, बाळासाहेब अलोणे, रवींद्र गायगोले, मोनिका वानखडे (मार्डीकर) यांनी उपस्थित केले आहेत.

खातेदारांनी भीती बाळगू नये

बँकेत सायबर हल्ला करण्याचा केवळ प्रयत्न झाला आहे. त्यामुळे बँकेच्या खातेदारांनी भीती बाळगण्याची गरज नाही. देशातील अनेक बँकांमध्ये अशा प्रकारच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. योग्य ते संरक्षणात्मक उपाययोजना करण्याच्या संदर्भात आज चर्चा झाली. अशा प्रकारचे सायबर हल्ले रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – बच्चू कडू, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

बँकेत मनमानी कारभार

बँकेतील खातेदारांच्या ठेवींचे संरक्षण व्हावे, यासाठी तातडीच्या उपाययोजनांसाठी ७.३० लाख रुपयांच्या खर्चाला आम्ही मंजुरी दिली आहे. सायबर हल्ला थोपविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे. पण बँकेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सत्ताधारी संचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे. नियमबाह्य पद्धतीने कामकाज सुरू आहे. आम्ही उपस्थित केलेल्या मुद्यांवर उत्तरे दिली जात नाही. अखेरीस न्यायालयात दाद मागावी लागते. – वीरेंद्र जगताप, संचालक, जिल्हा सहकारी बँक.