अंबाझरी ‘ओव्हर फ्लो’ परिसरात स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारण्यात येत असून त्या ठिकाणी रविवारी स्वामींचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. परिसरात सौंदर्यीकरण करण्यात येणार असून येत्या ऑगस्ट महिन्यात या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
स्वामी विवेकानंदांची सार्धशतीनिमित्त २०१२ मध्ये तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या कार्यकाळात अंबाझरी ‘ओव्हर फ्लो’ परिसरात स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तसा प्रस्ताव समितीने मंजूर केला.
त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होऊन काम सुरू करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मार्च २०१३मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते. मधल्या काळात आलेल्या अडचणीमुळे त्याचे काम रखडले होते. मात्र, महापालिकेच्या निवडणुका समोर असताना त्यापूर्वी या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे असा संकल्प सत्तापक्षाने केला आणि काम सुरू केले आहे. सत्तापक्षाचा ‘ड्रीम पोजेक्ट’ असलेल्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.
बसविण्यात आलेला स्वामी विवेकानंदांचा पुतळ्याची उंची २१ फूट असून स्मारकासह पुतळ्याची उंची ५१ फूट राहणार आहे.
रविवारी सकाळी पुतळ्याची स्थापना करण्यात आली असून किमान दोन ते तीन महिने त्या ठिकाणी काम चालणार आहे. ऑगस्ट महिन्यात त्याचे लोकार्पण करण्याचा सत्तापक्षाचा मानस आहे.
या स्मारकाचा एकूण खर्च ३ कोटी असून कन्याकुमारीप्रमाणेच हे स्मारक राहणार आहे. कन्याकुमारीत ज्याप्रमाणे सूर्यास्ताचे विहंगम दृष्य पाहता येते तसेच दृष्य या ठिकाणी बघावयास मिळेल. स्मारकाजवळ जवळपास ३ फूट पाणी राहील हे पाणी कायम प्रवाहीत राहणार आहे. शिवाय म्युझिकल फाऊंडेनदेखील जोडले जाणार आहे.
चित्रपट अभिनेत्री रेवती यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. दिल्लीमधील मूर्तीकार पद्मश्री रामसुतार यांनी स्वामी विवेकानंदांची मूर्ती तयार केली आहे. या ठिकाणी लेझर लाईट्स अॅण्ड साऊंड शो निर्माण करण्यात येणार आहे.
याशिवाय या ठिकाणी सौंदर्यीकरण करून तो परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. यावेळी सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2016 रोजी प्रकाशित
अंबाझरी ‘ओव्हर फ्लो’ परिसरात स्वामी विवेकानंदांचा पुतळा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मार्च २०१३मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 05-04-2016 at 04:00 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambazari overflow point goes abuzz as swami vivekananda statue placed on pedestal