नागपूर: देशात भाषेबाबत सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांनी इंग्रजी भाषेसंदर्भात मोठे विधान केले होते. भारतीय भाषांऐवजी इंग्रजीला महत्त्व देणाऱ्यांवर निशाणा साधताना शहा म्हणाले की, या देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल. ती वेळ आता फार दूर नाही. असा समाज आपल्या हयातीत निर्माण होईल. आपल्या देशाच्या भाषा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत, असेही शहा म्हणाले होते. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमित शहा यांच्या या विधानाचा विरोध केला. अल इब्राहिम एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना तुम्ही दिवसातून एकदा नाही शंभर वेळा नमाज करा मात्र इंग्रजी भाषा शिका, असा सल्ला गडकरींनी दिला.
सध्या देशात भाषेवरून वाद सुरू आहे. महाराष्ट्रात हिंदी भाषा सुरू करण्यावरून अलीकडेच वाद निर्माण झाला होता. शेवटी राज्य सरकारला माघार घ्यावी लागली. तर गृहमंत्री अमित शहा यांनी इंग्रजी भाषा शिकणाऱ्यांना लाज वाटेल, असे विधान केले होते. मात्र नेहमीप्रमाणेच नितीन गडकरी यांनी स्पष्ट विधान केले आहे. ते काल या कार्यक्रमात म्हणाले की, शिक्षण ही आपली शक्ती आहे. शिक्षण घेतल्याशिवाय कुठल्या समाजाचा विकास होऊ शकत नाही. आज अनेक लोक ट्रक ड्रायव्हर, चहाचे दुकान अशी छोटी कामे करताना दिसतात. त्यांच्यामध्ये चांगली कला कौशल्य असूनही केवळ शिक्षणाअभावी ते मागे पडलेले आहेत. त्यामुळे सगळ्या भाषांचे चांगले शिक्षण घ्यावे, असं आवाहन त्यांनी केले.
शिक्षण घेत असताना पदवी अभ्यासक्रमात तुम्हाला खूप गुण मिळाले म्हणजे तुम्ही यशस्वी झाला तसे नाही. मी विधी अभ्यासक्रमात असताना मागच्या बाकावर बसणारे आज मोठे वकील झाले तर गुणवत्ता यादीत आले नाही असेही गडकरी म्हणाले.
गडकरी नेमके काय म्हणाले?
गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रात मंत्री असताना अनेक लोकांना त्यावेळी महाविद्यालय दिले जात होते. मात्र मी महाविद्यालय घेण्यास नकार दिला. कारण पैसे घेऊन नोकरी देणे हे माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी माझ्या वाट्याला आलेले अंजुमन कॉलेज दुसऱ्यांना देऊन टाकले. आज या महाविद्यालयातून अनेक मुस्लिम विद्यार्थी अभियंते होतात. त्यामुळे चांगले शिक्षण घेतले तर यश मिळते हे यातून दिसून आलं. त्यामुळे तुम्ही मंदिरात जा किंवा मज्जिदमध्ये जा, दिवसातून एकदा नाही शंभर वेळा नमाज पठण करा, मात्र शिक्षण घ्या. इंग्रजी विज्ञान, गणित हे विषय सर्वांनी शिकायला हवेत. यासोबत तुम्हाला कौशल्य विकासही शिकता यायला हवे. त्यातून आज अनेक रोजगार निर्माण होत आहेत असे गडकरी म्हणाले.