चंद्रपूर : ‘अम्मा चौक’चा वाद आता पवित्र दीक्षाभूमीपर्यंत पोहचला आहे. दीक्षाभूमी परिसरात भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रींच्या नावे ‘अम्मा की पढाई’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. मात्र या उपक्रमाला आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आता विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्षाने भाजप दीक्षाभूमीची जागा हडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. येथेच ‘अम्मा’चे स्मारक उभारले जाणार, असा दावाही आपने केला आहे.
मात्र, महापालिका आयुक्तांनी हा दावा फेटाळून लावला आहे. भाजप महानगर अध्यक्षांनी या परिसराचे ‘दीक्षाभूमी चौक’ असे नामकरण करावे, अशी मागणी एका निवेदनातून केली आहे. एकंदरीत, ‘अम्मा चौक’ प्रकरण आमदार जोरगेवार यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.
‘अम्मा चौक’ व स्मारकाच्या प्रस्तावाला महापालिकेने मंजुरी दिली असून बांधकामालाही सुरुवात झाली. मात्र, काँग्रेसच्या विरोधानंतर महापालिका आयुक्तांनी बांधकामाला स्थगिती दिली. एका चौकाला कष्टकरी महिलेचे नाव दिले जात आहे, त्याला विरोध करणे दुर्दैवी आहे, असे जोरगेवार यांचे म्हणणे आहे. अशातच, आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार व समर्थकांनी दीक्षाभूमीलगत ‘अम्मा स्मारक’ होणार असल्याची चित्रफीत समाज माध्यमावर सार्वत्रिक केली.
दुसरीकडे, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन याला विरोध दर्शवला. त्यावर आयुक्तांनी, तिथे अम्माचे स्मारक नाही, तर केवळ सौंदर्यीकरण होणार, असे स्प्ष्ट केले. जोरगेवार यांनी काही दिवसांपूर्वीच दीक्षाभूमी येथे ‘अम्मा की पढाई’ हा उपक्रम सुरू केला होता. पीपल्स रिपब्लिकन पक्षाने (पीरिपा) त्यालाही विरोध दर्शवला आहे. पीरिपा कार्यकर्त्यांनी बांधकाम सुरू असलेल्या जागेवर ‘दीभाभूमी चौक’ असे फलक लावले.
आंबेडकरी समुदायाचा विरोध पाहून भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी वरोरा नाका चौकाचे नामकरण ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी चौक’ करावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
दीक्षाभूमी परिसरात ‘अम्मा’च्या नावे अभ्यास केंद्र सुरू करून आमदार जोरगेवार यांनी मोठी चूक केली. आंबेडकरी समुदायाच्या मागे लागू नका, तुम्हाला महागात पडेल. प्रशासन तुमचे आहे. परंतु आंदोलनाचा हक्क आमचा आहे. या परिसराला बाबासाहेबांशिवाय इतर कुणाचेही नाव देता येणार नाही. यासाठी वेळप्रसंगी जीव देऊ. – अनिल रामटेके, शहराध्यक्ष, पीरिपा.
दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आमदार जोरगेवार यांच्या आईच्या नावे ‘अम्मा की पढाई’ केंद्र सुरू आहे. दीक्षाभूमीची ओळख पुसण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा प्रयत्न आमदार जोरगेवार यांच्या माध्यमातून सुरू आहे. हा प्रयत्न आम्ही उधळून लावू. – मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष, आप