शिवसेना पक्षात फूट पाडण्यासाठी भाजपाने ‘ऑपरेशन’ राबवले होते, असं विधान भाजपाने नेते गिरीश महाजन यांनी जळगावमधील सभेत केले होते. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान, या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बुलढाण्यात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा – गिरीश महाजनांच्या ‘त्या’ विधानानंतर शिंदे गटाचे संजय गायकवाड आक्रमक, म्हणाले “कोणी मुर्खासारखे…”
काय म्हणाले अमोल मिटकरी?
“गिरीश महाजन काही चुकीचं नाही बोलले. याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्या मनात जे होतं, तेच बाहेर आहे. सहा महिन्यापूर्वी भाजपानेच फोडाफोडीचं राजकारण केलं, हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही खोचक शब्दात टीका केली. “एकनाथ शिंदे काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत. रोज एकजण उठतो आणि त्यांच्या विरोधात बोलायला लागतो. विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका आहेत. त्यापैकी शिंदे गटाला एकही जागा मिळाली नाही, सर्व जागा भाजपाने घेतल्या. काल नवनीत राणा अमरावतीत बोलल्या की आमच्या मनातले मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत. चंद्रकांत पाटीलही म्हणाले होते, की छातीवर दगड ठेऊन आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. त्यामुळे शिंदे गटाचे भविष्य चांगलं नाही, हे एकनाथ शिंदे यांनाही माहिती आहे, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – VIDEO: आगामी निवडणुकीत पंकजा मुंडे आणि तुमचं वेगळं समीकरण दिसणार का? महादेव जानकर म्हणाले, “माझी बहिण…”
ईडी कारवाईवरून सोमय्यांनाही केलं लक्ष्य
यावेळी त्यांनी हसन मुश्रीफांविरोधातील ईडीच्या कारवाईवरूनही सोमय्यांवर टीकास्र सोडलं. “ईडी कारवाई करणार हे सोमय्यांना कसं माहिती होतं? सोमय्या काय ब्रम्हज्ञानी आहेत का? काही दिवसांपूर्वी सोमय्यांनी भावना गवळी, यशवंत जाधव यांच्याविरोधातही रान उठवलं होतं. मग शिंदे गटात गेल्या-गेल्या तुम्ही शांत का झालात? मुळात गणपती विसर्जनाच्या दिवशी हसन मुश्रीफ यांना विकत घेण्याचा प्रयत्न भाजपाने केला होता. मात्र ते विकल्या गेले नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.