अमरावती : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अमरावती विभागात बऱ्याच जागा रिक्त राहिल्या असून यंदा आतापर्यंत एकूण १ लाख ९१ हजार ७५ जागांपैकी ‘कोटा’, ‘कॅप’ आणि ‘ओपन टू ऑल’ फेरीतून १ लाख १८ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अजूनही तब्बल ७२ हजार ३५० जागा रिक्तच आहेत. इयत्ता अकरावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या ज्या विद्यार्थ्याचे प्रवेश अद्यापपर्यंत व्हावयाचे आहेत, त्यांच्यासाठी १५ ऑगस्ट ते १७ ऑगस्टपर्यंत विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष फेरीची गुणवत्ता यादी १९ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. २० ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांनी संबंधित उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावयाचा आहे, अशी माहिती ११ वी प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्रा. अरविंद मंगळे यांनी दिली आहे. सर्व शाखांमध्ये पुरेशा जागा शिल्लक आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.
अमरावती विभागातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ही १ लाख ९१ हजार ०७५ इतकी आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील ४२ हजार १८० जागांपैकी २१ हजार ३५२ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. अकोला जिल्ह्यातील ३७ हजार ४७५ जागांपैकी २६ हजार ९२२, बुलढाणा जिल्ह्यातील ४७ हजार जागांपैकी ३० हजार ३६५, वाशीम जिल्ह्यातील २४ हजार जागांपैकी १५ हजार ११ आणि यवतमाळ जिल्ह्यातील ४० हजार १३० जागांपैकी २५ हजार ७५ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
आतापर्यंत कला शाखेत ४५ हजार १७९, वाणिज्य शाखेत ९ हजार ६३४ आणि विज्ञान शाखेत सर्वाधिक ६३ हजार ९१२ असे एकूण १ लाख १८ हजार ७२५ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यंदा प्रथमच राज्यभरात केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार अकरावी प्रवेशासाठी फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा ही प्रक्रिया रखडली. यंदा शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा वेळेआधीच घेत निकालही १३ मे रोजी जाहीर केले होते. त्यानंतर १९ मेपासून विद्यार्थ्यांसाठी अकरावी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याची घोषणाही झाली होती.
१९ आणि २० मे रोजी सराव सत्रे पार पडल्यावर २१ मेपासून प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी सुरू होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात २६ मेपासून ही प्रक्रिया सुरू झाली. सात-आठ वेळा प्रवेशाचे वेळापत्रक बदलण्यात आले. प्रवेशासाठी चार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांनी यंदा अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाकडे कल दर्शविला.