अमरावती: विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर अमरावतीत चढाओढीचे राजकारण समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) चिखलदरा येथील नेते आणि तीन वेळा नगराध्यक्ष राहिलेले राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी १५ माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
विशेष म्हणजे हा प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक प्रभारी संजय कुटे यांच्याशी चर्चा केल्यानंतर झाल्याचा दावा राणा गटाकडून केला जात आहे. भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. नवनीत राणा यांनी सोमवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.
राजेंद्र सोमवंशी यांचा भाजप प्रवेश हा अमरावतीतील राष्ट्रवादी (अजित पवार गट) साठी मोठा राजकीय ‘धक्का’ मानला जात आहे. रवी राणा आणि अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रृत आहे. सोमवंशींच्या पक्षांतराने राणा दाम्पत्य आणि खोडके दाम्पत्यातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
सोमवंशी यांची चिखलदरा नगर परिषदेच्या राजकारणावर मजबूत पकड आहे. राजेंद्र सोमवंशी यांच्या पत्नी विजया सोमवंशी यादेखील माजी नगराध्यक्ष होत्या. त्यामुळे त्यांच्या पक्षांतरामुळे एका मोठ्या मतदार गटाला भाजपच्या बाजूने वळण्यास मदत होईल, असा दावा राणा गटाकडून करण्यात येत आहे.
आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने राजेंद्र सोमवंशी आणि नगरसेवकांचे स्वागत केले. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जवळ आल्या असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये खेचून आणण्याची रवी राणा यांनी केलेली रणनीती चर्चेत आली आहे. या प्रवेशामुळे चिखलदरा नगर परिषदेच्या राजकारणावर थेट आणि मोठा परिणाम होईल, असा दावा राणा गटाकडून करण्यात येत आहे.
सोमवंशी कुटुंबाच्या प्रवेशामुळे चिखलदरा आणि अमरावती जिल्ह्यातील पक्षाला मोठे बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल. तसेच, चिखलदऱ्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प नवनीत राणा यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी आल्हाद कलोती, राजेंद्र मांगलेकर, अन्वर हुसेन, वेदांत सूरपाटणे, गुरु ठाकूर सोमवंशी, जितू पचोरी, तिलक मिश्रा, सूरज तिवारी, पंकज पचोरी, अनुप सोमवंशी, अरुण तायडे, शेख भिक्कम भाई, अमोल हाते, सुनील काळे, विनोद गूहे, सुधा तिवारी, राजू कुरील, ललित समंदुरकर, सुनील खराटे, उमेश ढोणे आदी उपस्थित होते.
