अमरावती : अवघे २८ वर्षे वय. नव्या स्वप्नांना जिद्दीचे पंख लावून आयुष्याला आकार देण्याचे हे वय. पण, नियतीला या तरूणाची परीक्षा पाहण्याची लहर आली. त्याला मूत्रपिंडाचा (किडनी) विकार असल्याचे निदान झाले. डायलिसीस सुरू झाले. मुलाचा हा त्रास आईला बघवत नव्हता. मुलासाठी मातेने आपले काळीत मोठे केले आणि स्वत:ची एक किडनी देऊन मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या आपल्या मुलाला सकुशल बाहेर खेचून आणले. अक्षय राजू सातपुते असे या भाग्यवान युवकाचे नाव आहे.

येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) येथे ही तब्बल ६० वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अमरावतीचे रहिवासी असलेले अक्षय सातपुते हे किडनी विकाराने ग्रस्त असल्याने त्यासाठी बाहेर उपचार पद्धती सुरू होती. काही महिन्यांपासून डायलिसीस उपचार करण्यात येत होते. तेव्हा डॉक्टरांनी अक्षय यांना किडनी प्रत्यारोपणाविषयी माहिती दिली.विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात होत असलेल्या यशस्वी आणि विनामूल्य शस्त्रक्रियेसाठी विविध जिल्ह्यांमधून आणि इतर राज्यांमधूनही रुग्ण येत असतात, हे सातपुते कुटुंबीयांना कळल्यानंतर त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

डायलिसिस यावर दीर्घकाळ उपाय नसून व होणारा त्रास बघून किडनी प्रत्यारोपण हा यावरील योग्य उपाय आहे, असे जेव्हा डॉक्टरांनी सांगितले त्यावेळी मुलाच्या पुढील भविष्याचा विचार करून आई रेखा राजू सातपुते (४७ वर्ष) यांनी आपली एक किडनी मुलगा अक्षयला देण्याचा निर्णय घेतला आणि त्याला नवीन जीवन दिले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया विनामुल्य करण्यात आली.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रणित काकडे, डॉ.नयन काकडे, युरो सर्जन डॉ.राहुल पोटोडे, डॉ.विक्रम देशमुख, डॉ. प्रतीक चिरडे, डॉ.विशाल बाहेकर, डॉ राहुल घुले ,बधिरिकरण तज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ रमणिका ढोमणे ,डॉ. शितल सोळंके, डॉ अश्विनी मढावी, डॉ.विक्रांत कुळमेथे, डॉ.माधव ढोपरे, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ.नाहीद, डॉ. रमणीय, डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे, डॉ. श्रद्धा जाधव, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) शितल बोंडे, ऋषिकेश धस, डॉ.सोनाली चौधरी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने मधील डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यांनी मुंदाने, त्याचप्रमाणे अधीसेविका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये विशेष सहकार्य होते.