अमरावती : एका दहा वर्षीय मुलीला पोटात तीव्र दुखण्‍याच्‍या तक्रारीनंतर रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. तपासणी केली असता तिच्‍या पोटात मोठ्या गाठीसारखे काहीतरी दिसले. शस्‍त्रक्रियेनंतर असे आढळून आले की, ते सुमारे अर्धा किलो वजनाचे केसांचे गुच्‍छ होते. अमरावती जिल्‍ह्यात ही धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही मुलगी सतत मळमळ, उलट्या आणि भूक न लागण्‍याच्‍या त्रासामुळे उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांकडे गेली. तेथील डॉक्टरांनी तिला अमरावती शहरातील डॉक्टरांकडे जाण्‍याचा सल्ला दिला. तिचे कुटुंबीय तिला उपचारासाठी नागपूरलाही घेऊन गेले. परंतु मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. शेवटी त्यांनी मुलीला डॉ. उषा गजभिये (बालरोगतज्‍ज्ञ) यांच्या रुग्‍णालयात दाखल केले. प्राथमिक तपासणीअंती डॉक्टरांनी पोटाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

१७ जुलै रोजी करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान मुलीच्या पोटातून तब्बल अर्धा किलो वजनाचा केसांचा पुंजका बाहेर काढण्यात आला. केसांचा गोळा पोटात (जठरात) जमा होत गेल्याने तिला खाणे-पिणे कठीण झाले होते. या अवस्थेला वैद्यकीय भाषेत ‘ट्रिचोबेझोआर’ असे म्हणतात.

पालकांनी सांगितले की, मुलीला गेल्या तीन ते चार वर्षांपासून केस उपटून खाण्याची सवय होती. कुटुंबातील सदस्यांना वाटले की समजावून सांगितल्यानंतर ही सवय निघून जाईल. जेव्हा मुलीने पोटदुखीची तक्रार केली आणि अन्न खाल्ले नाही, तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिच्या पोटात जवळजवळ अर्धा किलो केस असल्याचे आढळून आले.अमरावतीसह नागपूरमधूनही उपचार घेऊनही आराम न झाल्याने शेवटी डॉ. उषा गजभिये यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालरोग तज्ज्ञ डॉ. उषा गजभिये, डॉ. जयेश इंगळे आणि त्यांच्या चमूने जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

केस पोटात साचल्यामुळे तिची पचनक्रिया बिघडली होती. तिला जेवणही शक्य होत नव्हते. शस्त्रक्रियेनंतर मुलगी आता व्यवस्थित असून जेवते. तसेच पूर्वीपेक्षा अधिक उत्साही असल्याचे मुलीच्या पालकांनी सांगितले.आपली पचनसंस्था केस पचवू शकत नाही. म्हणूनच केस पोटाच्या भिंतीला चिकटतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर एखादी व्यक्ती सतत केस खात असेल तर ते एकत्र चिकटतात आणि गुठळ्याचे आकार घेतात. पालकांनी मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे. मुले शांत, चिंताग्रस्त, किंवा विचित्र वस्तू खात असतील तर तातडीने मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा मुलांची लक्षणे लवकर ओळखल्या गेली पाहिजेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.