अमरावती : शेतकरी कर्जमुक्तीसाठी आवाज उठवणे हा गुन्हा झाला आहे का? आपल्या मागण्यांचे फलक लावणे म्हणजे देशद्रोह आहे का?, असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकाला केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोर्शी दौऱ्याचे औचित्य साधून केवळ ‘कर्जमाफीची तारीख कधी?’ असा सवाल करणाऱ्या शेतकऱ्यांना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वरुड तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या सोबत प्रहार तालुका संपर्कप्रमुख अजय चौधरी, प्रवीण कडू, विलास पांडगडे आणि इतर कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी फलक लावत होते. पण सरकारने लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्यांनाच गुन्हेगार ठरवण्याचा उद्योग सुरू केल्याचे प्रहारचे म्हणणे आहे.आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा भूमिपूजन सोहळा, शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रक्षेत्र इमारतीचे लोकार्पण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वरूड आणि मोर्शीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला, पण शेतकऱ्यांचे कोणतेही आंदोलन उभे राहू नये म्हणून आधीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. शेतकरी कर्जमुक्तीची तारीख विचारतोय, आंदोलन शेतकऱ्यांचा आवाज दाबणे म्हणजे उत्तर आहे का?, असा सवाल प्रहारने केला आहे.

जेव्हा शासन अकार्यक्षम ठरते, आपणच केलेल्या घोषणांचा त्यांना विसर पडतो तेव्हा जनतेला आंदोलन करणे किंवा सरकारला प्रश्न विचारणे ही एकमेव शस्त्र उरते आणि तेच शस्त्र सरकारकडून पोलिसी बळाने हिसकावले जात असल्याची टीका प्रहारने केली आहे. ही केवळ लढाई नाही, ही आमच्या भविष्यासाठीची उठाव आहे. सरकार आमच्यावर कितीही बंदोबस्त लावो, आमचा प्रश्न महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवला जाईल.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले कर्जमाफीचे हे आंदोलन म्हणजे पोरखेळ नाही, तर भविष्यातील शेतकरी क्रांतीचा पहिला अध्याय आहे. पोलीस बळाने प्रश्न मिटत नाहीत, प्रश्न मिटतात ते उत्तराने. कर्जमाफीची तारीख जाहीर करा, नाहीतर ही अन्यायग्रस्त शेतकरी शेतमजूर सरकारला प्रश्न विचारतच राहणार, सरकारच्या विरोधात आंदोलने करतच राहणार. शासनाच्या डोळ्यात डोळा घालून प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करणे ही लोकशाहीची हत्या आहे. शासन जर उत्तर टाळत असेल, तर प्रश्न अधिक तीव्र होईल कारण आज शेतकरी आपल्या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला आहे, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे.