अमरावती : एका महिलेला समाज माध्‍यमावरून प्रेमाची साद घालून इमोजी पाठविण्यात आली. त्यांचा ऑनलाइन पाठलाग करण्यात आला. त्यांना खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकीसुद्धा देण्यात आली. ही घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तिलक ठाकूर रा. अमरावती असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारीनुसार, १९ जुलै रोजी पहाटे पीडित महिला ही झोपेतून उठली. काही वेळाने त्यांनी मोबाइल बघितला. त्यावेळी त्यांना त्यांचा मित्र तिलक ठाकूर याच्या समाज माध्‍यमावरील अकाउंटवरून त्यांच्या अकाउंटवर ‘आय लव्ह यू’ तसेच किसिंग इमोजी पाठविण्यात आल्याचे दिसून आले. ‘आय लाईक यू, मै तुमसे प्यार करता हू’, असा संदेशसुद्धा त्यांना दिसून आला. त्याचवेळी त्याने व्हाइस कॉलवर त्यांना उद्देशून गाणेदेखील म्हटले. तिलक ठाकूर याने पीडित महिलेला १९ जुलै रोजी पहाटे ३.४१ पासून रात्री १२ वाजेपर्यंत बरेच संदेश पाठविले. २० जुलै रोजी सकाळी ७.१२ वाजताच्या सुमाराससुद्धा त्याने ‘गुड मॉर्निंग’ असा मेसेज त्यांना पाठविला. मी तुमच्या रिप्लायची वाट पाहतो, असे म्हणून त्याने पीडित महिलेचा छुपा पाठलाग चालविला. त्याचवेळी त्याने पीडित महिलेला खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली. मला सहकार्य कर, अशी धमकीसुद्धा त्याने त्यांना दिली. या प्रकाराने त्या घाबरल्या. त्यानंतर पीडित महिलेने स्वत:ला सावरत राजापेठ ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

हेही वाचा – लैंगिक छळाची तक्रार केली म्हणून नोकरीवरून काढले, मात्र उच्च न्यायालयाने…

हेही वाचा – गोंदिया : मुरमाच्या खाणीतील खड्ड्यात आंघोळ करणे जिवावर बेतले; मुलाचा बुडाल्याने मृत्यू

बालकांचे अश्लील व्हिडीओ केले प्रसारित

बालकांचे अश्लील व्हिडीओ तयार करून ते समाज माध्‍यमांवर प्रसारित करण्यात आले. या प्रकरणी, सायबर पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार यांच्या तक्रारीवरून चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनिश १२, मयंक ५६०३, इशू पटेल ४९६ व आशू उदापुरे या चार संशयित समाज माध्‍यमावरील अकाउंटधारकांविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांचे आयपी ॲड्रेस (इंटरनेट प्रोटोकॉल) हे अमरावती पोलीस आयुक्तालय परिसरातील असल्याने त्याबाबत शहर सायबर पोलिसांनी चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले. ९ मे २०२१, ६ मे २०२१, २६ जानेवारी २०२१ व १९ जानेवारी २०२१ ते ८ जानेवारी २०२४ या कालावधीत ते व्हिडीओ अमरावती शहरातील चौघांच्या आयपी ॲड्रेसवरून प्रसारित झाल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाला दिल्ली येथील एनसीएमईसी (नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ॲण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन) यांच्या चाइल्ड पोर्नोग्राफी टिपलाइननुसार देण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.