अमरावती : स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ या स्पर्धेत ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराने २०० पैकी २०० गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पण, शहरात निर्माण झालेल्या कचरा समस्येमुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

अमरावती महापालिका क्षेत्रातील रिंग रोड कठोरा जकात नाक्याजवळील एका ले-आऊटसमोर महापालिकेच्या घंटागाडीतून कचरा टाकला जात असल्याने, या ठिकाणी डम्पिंग डेपोसारखी स्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधीने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी आज कठोरा रोडवर ठिय्या आंदोलन करत महापालिका प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला. आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वारंवार निवेदन देऊनही हा प्रश्न कायम असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

आमदार खोडके यांची मध्यस्थी

आंदोलनाची माहिती मिळताच आमदार सुलभा खोडके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. कठोरा जकात नाका येथील मोकळ्या जागेत घंटागाडीतील कचरा टाकला जात असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रहिवाशांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची कैफियत आंदोलनकर्त्यांनी मांडली. यावर खोडके यांनी तात्काळ महापालिका आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी आंदोलनाच्या स्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी विनंती महापालिका आयुक्तांना केली. स्वच्छ वायू सर्वेक्षणात पहिला पुरस्कार मिळालेल्या अमरावती शहराची ही अवस्था स्वत: पहावी, असे सुलभा खोडके म्हणाल्या.

प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन

आमदार खोडके यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि स्वच्छता व वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी खोडके यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून, तत्काळ हा कचरा उचलण्याची तसेच यापुढे कठोरा भागातील घंटागाडीतील कचरा निर्मनुष्य ठिकाणी टाकण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या. त्यासोबतच, नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेली ही हयगय खपवून घेणार नाही, असा सज्जड दमही दिला.

परिसरातील तणाव निवळला

महापालिका प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर आमदार सुलभा खोडके यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले. याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा खोडके आणि यश खोडके यांचे आभार मानले. आंदोलन मागे घेतल्यामुळे कठोरा रोडवरील वाहतूक पूर्ववत झाली असून परिसरातील तणाव निवळला आहे.