अमरावती : शाळा हे विद्येचे मंदिर आहे असे म्हणतात. कारण शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञान आणि विविध विषयांच्या माहितीसोबतच शिस्त आणि चांगले नागरिक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या मुल्यांचे शिक्षण देखील मिळते. पण याच मंदिरात मुलांना हाणामारीचे धडे मिळाले तर काय होईल? होय, अन् हे धडे खुद्द आदर्श समजले जाणारेच शिक्षक देत असतील तर तुम्ही काय म्हणाल? अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत घडली आहे. या शाळेतील स्टाफ रूममध्ये प्रभारी मुख्याध्यापिका आणि शिक्षकेत चांगलीच हाणामारी झाली.
या प्रकरणी या शिक्षिकांनी एकमेकींच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर वलगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करताना समज देऊन न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेमध्ये काही मुद्यांवरून मतभेद सुरू होते. बुधवारी सकाळी हा वाद आणखी वाढला. शाळेतील स्टाफ रूममध्ये त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.
परस्परविरोधी तक्रारी
प्रभारी मुख्याध्यापिकेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, शिक्षिका सकाळी लवकर शाळेत येऊन अमरावती येथे मिटिंगला जाण्याची परवानगी मागत होत्या. मुख्याध्यापिकेने त्यांना सांगितले की, मिटिंग ११ वाजता असल्याने तुम्ही १० वाजता जाऊ शकता. यावरून त्यांच्यात वाद झाला. शिक्षिकेने शिवीगाळ करत, तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली आणि डोक्याचे केस पकडून मारले, असे मुख्याध्यापिकेने तक्रारीत म्हटले आहे.
दुसरीकडे, शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या शाळेत आल्यावर प्रभारी मुख्याध्यापिकेने त्यांना ‘काल ब्लॉक रिसोर्स सेंटरला (बीआरसी) का गेल्या होता?’ असा प्रश्न विचारला. शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेची उत्तरपत्रिका आणि अहवाल बीआरसी कार्यालयात ५ वाजेच्या आधी जमा करणे आवश्यक असल्याने मी तिथे गेले होते, असे उत्तर शिक्षिकेने दिले. यावर प्रभारी मुख्याध्यापिकेने ‘तुम्हाला कारणे दाखवा नोटीस देईन’ असे सांगितले. त्यानंतर स्टाफ रूममधील इतर शिक्षक बाहेर गेल्यावर प्रभारी मुख्याध्यापिकेने ओढाताण करत कपडे फाडले, नखांनी ओरखडले आणि ‘तुझ्याकडून जे होते ते करून घे’ अशी धमकी दिल्याचे शिक्षिकेने तक्रारीत नमूद केले आहे.
दोन्ही महिला शिक्षिकांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना समज देऊन न्यायालयात दाद मागण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वलगाव पोलीस करत आहेत. या घटनेची चर्चा शिक्षण वर्तुळात रंगली आहे.